आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घालून अमेरिकेत फिरला, 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:47 AM2023-07-12T10:47:37+5:302023-07-12T10:49:18+5:30
असं नाही तर तसं तरी, पृथ्वीक प्रतापने आईचं स्वप्न पूर्ण केलंच.
सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमाने ब्रेक घेतला आहे. कारण हास्यजत्रेची संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. समीर चौघुले, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, वनिता खरात आणि इतर सर्वच टीम मेंबर अमेरिकेतील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. दरम्यान पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) नुकतीच सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. अमेरिका फिरण्याची पृथ्वीकच्या आईची इच्छा आहे जी पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून पृथ्वीकने काय शक्कल लढवली बघा.
अमेरिकेत सध्या हास्यजत्रेची संपूर्ण टीम धम्माल करत आहे. प्रयोग करतच इतर वेळी न्यूयॉर्क शहरात फिरण्याचा आनंदही घेत आहे. दरम्यान पृथ्वीक प्रतापने हिरव्या रंगाचा कुर्ता घालून न्यूयॉर्कमध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमागचं आणि कुर्त्यामागचं नेमकं कारण काय हे त्याने पोस्टमधून स्पष्ट केलंय.
तो लिहितो, 'अमेरिकेला येण्यासाठी ची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना… खूप विचार केला आणि लक्षात आलं की आता सध्या तरी आई ला प्रतिकात्मक रूपे अमेरिकेत घेऊन जाऊ शकतो म्हणून आज न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं तेवढच आपलं आई आपल्या सोबत असल्याची फीलिंग.
बाय द वे इथे अमेरिकेत तसं वातावरण थोडं गोंधळात पाडणारं आहे मध्येच ऊन लागत मध्येच पाऊस त्यामुळे तब्येतीवर होणारा परिणाम… त्यात सतत चा प्रवास, लागोपाठ शो यामुळे आलेला थकवा… हे सगळं आज जरा कमी झालं …
कारण ऊन, पाऊस, थकवा, आजारपण हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही जर आपण आईच्या पदरा खाली असू. मिस यू अम्मा.
तळटीप : लवकरच आई ला अमेरिका वारी घडवेन त्यामुळे चिंता नसावी.
पृथ्वीकने आईसाठी लिहिलेली ही गोड पोस्ट वाचून सगळेच भावूक झालेत. 'खूप गोड लिहिलंय दादा','आईला नक्कीच अमेरिका प्रवास घडवशील' अशा कमेंट्स इतरांनी केल्या आहेत. प्रियदर्शनी इंदलकर, स्नेहल शिदम, वनिता खरात, अक्षया नाईक यांनी त्याचं कौतुक केलंय.