'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:46 PM2024-10-05T12:46:04+5:302024-10-05T12:47:03+5:30

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'कार सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट चर्चेत आहे

maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami post on the status of marathi classical language | 'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

३ ऑक्टोबरला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध स्तरांमधून ही मागणी करण्यात येत होती. अखेर ३ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी केलेली खास पोस्ट चर्चेत आहे.

सचिन गोस्वामींची खास पोस्ट चर्चेत

सचिन गोस्वामींनी फेसबुकवर पोस्ट करुन लिहिलंय की, "मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला ही आनंदाची बातमी आहे..आता, "आम्ही बोलतो तीच मराठी" असा दुराग्रह असू नये.सर्व पोटभाषा , त्यांचे व्याकरण, उच्चार याबाबत दूजाभाव,द्वेष भाव नसावा. कारण हा दर्जा ,ती पुरातन भाषा आहे हे सिद्ध झाल्याने मिळाला आहे. आज जी प्रमाण भाषा म्हंटली जाते ती अनेक बदल स्वीकारत इथवर आली आहे . पुढेही त्यात अनेक बदल होणारच आहे. त्यामुळे पेठीय ते चावडीवरील सर्व भाषा प्रवाहांचा या अभिजाततेत समावेश आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे..."

 

मराठी भाषेला अभिजात दर्जा

3 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्वांना ही खास आनंदाची गोष्ट सर्वांना सांगितली. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच भारतीय भाषांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याकडे आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. आता आज मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांनाही अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे." या निर्णयानंतर मराठी माणसांनी आणि अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केलाय. दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे सर्वेसर्वा सचिन गोस्वामींनी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Web Title: maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami post on the status of marathi classical language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.