"आमची भाजीची गाडी होती", घरच्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदाच बोलली शिवाली, म्हणाली, "पप्पा रिक्षा चालवून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:16 AM2024-01-02T11:16:38+5:302024-01-02T11:17:25+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने सांगितली घरची परिस्थिती, म्हणाली, "माझे पप्पा वडापावच्या गाडीवर..."
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. अनेक नवोदित कलाकारांना हास्यजत्रेमुळे संधी मिळाली. या संधीचं सोनं करत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करून लोकप्रियता मिळवलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे शिवाली परब. कल्याणची चुलबुली अशी ओळख असलेल्या शिवालीने हास्याच्या फवाऱ्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवालीने अपार कष्टांनी सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं.
शिवालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं. 'संपूर्ण स्वराज' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शिवाली पहिल्यांदाच घरच्या परिस्थितीबद्दल बोलली. "माझे पप्पा फॅमिली मॅन आहेत. ते सगळ्यांनाच खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी कुटुंबच सगळं काही आहे. ते कधीच कोणाला दुखवत नाहीत. पप्पांचा हा गुण माझ्यातही आहे. त्यांना जसं कुटुंबासाठी करावंसं वाटतं. तसंच मलाही वाटतं. मी ज्यांच्याबरोबर लहानपणापासून राहिली आहे. त्या सगळ्यांसाठी मला काही ना काही करावंसं वाटतं," असं शिवाली म्हणाली.
पुढे तिने घरच्या परिस्थितीबाबत खुलासा केला. ती म्हणाली, "माझ्या पप्पांची वडापावची गाडी होती. ते रिक्षा चालवायचे. आमची भाजीचीही गाडी होती. ते सगळं करायचे. हे करून ते जॉबही करायचे. भाजीच्याच गाडीवर आम्ही मंचुरियनही विकायचो. संध्याकाळी पप्पा भाजीच्या गाडीवर यायचे. माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले आहेत. आम्ही वर्षभरातून दिवाळीला फक्त एकदाच कपडे घायचो. तरीही त्यांनी कधीच मला तुला पैसे कमवायचे आहेत, असं सांगितलं नाही. पण, घरातील परिस्थिती बघून आपल्याला पैसे कमवायला हवेत, हे मला जाणवलं. परिस्थिती सगळं काही शिकवून जाते."
हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिची शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली. शिवाली सोनी टीव्हीवरील 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेतही झळकली होती. तिने 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.