Vanita Kharat : ‘कबीर सिंग’चा तो सीन शूट झाल्यावर शाहीद काय म्हणाला? वनिता खरातने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 04:37 PM2023-04-18T16:37:27+5:302023-04-18T16:37:45+5:30
Vanita Kharat, Shahid Kapoor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोमधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात (Vanita Kharat ) छोट्या पडद्यावरची एक लोकप्रिय अभिनेत्री. ‘कबीर सिंग’ या शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor ) सिनेमात तुम्ही तिला बघितलं असेलच. मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा एक सीन या सिनेमात होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती? तर ती वनिता खरात होती. होय, कबीर सिंग (Kabir Singh) या सिनेमात तिने शाहिदच्या मोलकरणीची भूमिका साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात होती.
या सीनवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिता या सिनेमाबद्दल आणि शाहिद कपूरबद्दल बोलली. शाहीदबरोबर काम करण्याचा अनुभव वनिताने शेअर केला.
वनिता म्हणाली, “सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती. दडपण आलं होतं. पण, आपलं काम चांगलं असलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. बॉलिवूडमधील लोकांनी कधीच आपल्याला बघितलेलंच नसतं. त्यामुळे सुरूवातीला ते अगदी नॉर्मल वागतात. पण काम बघितल्यावर ते तितकंच कौतुकही करतात. कबीर सिंग’च्यावेळी मला हे विशेषत्वाने जाणवलं. मी शाहीदबरोबर पहिला सीन केल्यानंतरची त्याची माझ्याबद्दलची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. सुरुवातीला तो येऊन भेटला, बोलला. सीन शूट झाल्यानंतर तो एकदमच भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली, असं तो मला म्हणाला. शाहीदसोबत मी एका अवॉर्ड शोमध्येही काम केलेलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला. बॉलिवूडमध्ये मला खूप चांगली वागणूक मिळाली... ”
अशी मिळाली होती ‘कबीर सिंग’मधील भूमिका
वनिताला ‘कबीर सिंग’ मधील ही भूमिका कशी मिळाली, हेही इंटरेस्टिंग आहे. वनिताची एक मैत्रिण मुकेश छाब्रांच्या ऑफिसात काम करत होती. मुकेश छाब्रांना यासाठी एक नवा चेहरा होता. मैत्रिणीने वनिताची नाव सुचवलं आणि तिला ऑडिशनसाठी बोलवलं गेलं.. ऑडिशनमध्ये वनिता पास झाली आणि तिला ही भूमिका मिळाली. पहिल्यांदा वनिता सेटवर गेली तेव्हा वनिता प्रचंड दडपणात होती. पण सेटवरचे वातावरण, शाहिद कपूरचा स्वभाव बघून तिचं हे दडपण कुठल्या कुठे पळालं.