'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीची तुझेच मी गीत गात आहे मालिकेत एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:38 PM2022-07-04T14:38:23+5:302022-07-04T15:28:25+5:30
Maharashtrachi Hasyajatra : पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत या अभिनेत्रीची खास गट्टी जमली आहे.
Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेला कार्यक्रम कोणता? असं विचारल्यावर कुणीही एकच नाव घेईल. ते म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra). विनोदवीरांच्या धम्माल कॉमेडीनं पोटभर हसवणारा हा शो प्रेक्षकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे अनेक सीझन येऊन गेलेत. या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, समीर चौगुले, गौरव मोरे आणि वनिता खरात अशी विनोदाचे षटकार उडवणारी फौज आहे. आता या कार्यक्रमामधील एका प्रसिद्ध चेहऱ्याची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एंट्री होणार आहे.
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता असतानाच आता मालिकेत रंजना या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. हास्य जत्राफेम अभिनेत्री वनिता खरातची एंट्री होणार आहे.
रंजना ही भूमिका ती साकारणार आहे. रंजना एक छोटीशी खानावळ चालवत असते. वडिलांचा शोध घेत असलेल्या स्वरासोबत तिची भेट होते आणि काही काळासाठी ती तिला आपल्या खानावळीत आसरा देते. खास बात म्हणजे रंजना हे पात्र मालवणी भाषेत बोलतं. अभिनेत्री वनिता खरातसाठी मालवणी भाषेत बोलणं आव्हानात्मक होतं. मात्र सहकलाकारांच्या मदतीने मालवणी भाषेचा गोडवा जपत तिने हे पात्र खुलवलं आहे. रंजनाचा स्वभाव थोडासा रागीष्ट आहे मात्र स्वराची पार्श्वभूमी कळल्यावर ती खूप प्रेमाने तिला जवळ करते. मालिकेत हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत वनिताची खास गट्टी जमली आहे. इतक्या लहान वयात तिला असणारी समज पाहून थक्क व्हायला होतं. स्वरा साकारण्यासाठी अवनीने नागपूरी भाषा आत्मसात केली आहे. अतिशय गोड आणि हुशार अश्या स्वरासोबत काम करताना अतिशय मजा आली अशी भावना वनिताने व्यक्त केली.