"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:47 PM2023-11-11T17:47:03+5:302023-11-11T17:47:55+5:30
Samir Chaughule : समीर चौघुले यांनी हास्यजत्रेमुळे कोरोना काळातील बऱ्याच आत्महत्या टळल्याचं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharshtrachi Hasyajatra) या शो मधून सर्वांना पोट धरून हसवणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे समीर चौघुले (Samir Chaughule). या शोमधूनन त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमुळे त्यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ते बऱ्याचदा चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. दरम्यान एका मुलाखतीत समीर चौघुले यांनी हास्यजत्रेमुळे कोरोना काळातील बऱ्याच आत्महत्या टळल्याचं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे.
नुकतेच समीर चौघुले यांनी मित्र म्हणे या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी करिअर, खासगी आयुष्य आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. कोरोना काळाबद्दल बोलताना समीर चौघुलेंनी हास्यजत्रेनं लोकांना खूप काही दिल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, कोरोना काळा खूप कठीण होता, मात्र आम्हा कलाकारांसाठी वरदान ठरला. त्यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा घराघरात पोहोचली. कोविड सेंटर्समध्ये त्यावेळी हास्यजत्रा दाखवली जायची. हा खूप मोठा अभिप्राय आहे. कोविड काळात हास्यजत्रेमुळे खूप आत्महत्या टळल्या आहेत, आमच्याकडे बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले आहेत. इतकेच नाही तर आम्हाला माणसांनी येऊन हे भेटून सांगितले. तर काहींनी तर पत्रंदेखील दिली आहेत.
अशा परिस्थितीतही आम्ही सगळ्यांनी काम केले...
ते पुढे म्हणाले की, हा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. आमच्या घरी लोक आजारी पडत होते. माझे बाबा आणि पत्नी एकाच वेळी रुग्णालयात आणि मी दमनला कॉमेडी स्किट करत होतो. शूटिंग करून मी परतलो तेव्हा मी स्वतः १० दिवस रुग्णालयात होतो. हे इतके सगळे होऊनही आम्हाला विनोद करायचा आहे आणि अशा परिस्थितीतही आम्ही सगळ्यांनी काम केले. हे सगळे केवळ प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांचे आशीर्वादामुळेच शक्य झाले.