सोनी सबच्या भाखरवडी मालिकेत अण्णा महेंद्रला देणार हे वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:30 AM2019-04-20T06:30:00+5:302019-04-20T06:30:02+5:30
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे.
भाखरवडी ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेची कथा, मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावत आहेत. या मालिकेत देवेन भोजानी, परेश गणंत्रा मुख्य भूमिकेत असून प्रेक्षकांना त्यांचे काम चांगलेच आवडत आहे.
या मालिकेत प्रेक्षकांना गोखले आणि ठक्कर कुटुंबीयांची कथा पाहायला मिळत आहे. सध्या गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रचंड आनंदित आहे. यातील एका कुटुंबाने फॅन्सी ड्रेस स्पर्धा जिंकली आहे, तर दुसरे कुटुंब महेंद्रच्या (परेश गणात्रा) 'गायत्री स्नॅक्स अॅण्ड स्वीट्स' या दुकानाच्या उद्घाटनासाठी सज्ज झाले आहेत.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे. गायत्री स्नॅक्स अॅण्ड स्वीट्स या दुकानाच्या उद्धाटनामुळे ठक्कर कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. या उद्घाटनप्रसंगी अण्णा (देवेन भोजानी) आपली मैत्री दाखवण्यासाठी महेंद्रच्या दुकानात येणाऱ्या पहिल्या ग्राहकाला आपल्या हाताने भाखरवडी भरवणार असल्याचे जाहीर करणार आहेत. गंमत म्हणजे, पहिले ग्राहक त्यांचीच मुलगी विभा (रसिका वेंर्गुलेकर) असणार आहे तर दुसरीकडे दुकान सुरू झाल्यानंतरही महेंद्र काहीसा चिंतेत असणार आहे. कारण, त्याच्या दुकानात कोणीच ग्राहक येत नाहीयेत. सगळेच ग्राहक गोखले बंधूंकडेच भाखरवडीची खरेदी करत आहेत.
पहिल्या ग्राहकाला आपल्या हाताने भरवण्याचे आपले वचन अण्णा पाळतील का? या व्यवसायामुळे अण्णा आणि महेंद्र यांच्यातील मैत्रीवर परिणाम होईल का? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत महेंद्र ठक्करची भूमिका साकारणारा अभिनेता परेश गणात्रा सांगतो, "दुकान सुरू करायला महेंद्र फारच उत्साहित आहे आणि अण्णा पाठिंबा देत असल्यानेही त्याला आनंद झालाय. मात्र, काही दिवसांनंतर ग्राहक त्याच्या दुकानात न येता अण्णाच्याच दुकानात जात असल्याचं त्याच्या लक्षात येतं. यामुळे याचा त्यांच्यातील नात्यावर कसा परिणाम होतो, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे."
'भाखरवडी' ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता सोनी सबवर पाहायला मिळते.