महेश भट आणि किरण यांची कहाणी आहे 'आशिकी', लेक पूजा भटचा 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:36 PM2023-08-14T12:36:08+5:302023-08-14T12:36:42+5:30
Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी २चा ग्रँड फिनालेसाठी काही दिवस उरले आहेत. याआधी पूजा भटने बिग बॉसच्या घरात तिच्या आई-वडिलांची प्रेमकहाणीचा खुलासा करत सांगितले की आशिकी त्यांंच्या कथेपासून प्रेरित आहे.
बिग बॉस ओटीटी(Bigg Boss OTT 2)चा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे. सध्या घरामध्ये टॉप ५ फायनलिस्ट आहेत जे विजयासाठी लढत आहेत. दरम्यान, पूजा भट (Pooja Bhatt) आणि बबिका धुर्वे(Babika Dhurve)ने फिनालेपूर्वी एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पूजा भटने बाबिका धुर्वेला सांगितले की, आशिकी हा चित्रपट तिच्या आई-वडिलांच्या वास्तविक जीवन कथेपासून प्रेरित आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये, पूजा भट बाबिका धुर्वेला सांगताना दिसत आहे की आशिकी हा सुपरहिट चित्रपट तिच्या पालकांच्या जीवनावर आधारित आहे. पूजा पुढे म्हणाली, "आम्ही पूर्वी वांद्रे येथे राहायचो, हिंदुजा हॉस्पिटलच्या शेजारी आमची सिल्व्हर सँड्स नावाची इमारत होती आणि माझी आई घराजवळच्या शाळेत शिकवायला जात होती. त्यामुळे तुम्ही आशिकी चित्रपटाबद्दल ऐकले असेल तर चित्रपटात माझ्या आई-वडिलांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा आहे. माझी आई बोर्डिंग स्कूलमध्ये होती आणि माझे वडील शाळेच्या समोरच्या इमारतीत राहत होते. एक दिवस माझे वडील तिथे गेम खेळायला गेले होते. त्यावेळी त्यांना माझी आई दिसली. त्यावेळी आई ऍथलीट होती, हे पाहून माझे वडील त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडले.
महेश भट यांना किरणची अशी मिळाली जबाबदारी?
पूजा पुढे म्हणाली, म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी माझे वडील भिंतीवरून उडी मारून तिला बघायला गेले आणि पकडले गेले. त्यांना माझ्या आईबद्दल माहितीही नव्हते. मग मुख्याध्यापकांनी माझ्या आजीला फोन केला आणि तिला याबद्दल सांगितले आणि माझी आजी म्हणाली की तू जर इतका मोठा आहेस की भिंतीवर चढून माझ्या मुलीला भेटू शकशील तर तू माझ्या मुलीची कायम काळजी घेशील. त्या दिवशी माझ्या वडिलांनी माझ्या आईची जबाबदारी त्या वयात घेतली.
पूजा भट पुढे म्हणाली, ते त्यांच्या शाळेतील शेवटचे वर्ष पूर्ण करत होते. त्यानंतरही ते त्या वचनाला बांधील राहिले. माझे आई-वडील खूप पूर्वी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तुम्हाला माहिती असेल की हे माझे दुसरे कुटुंब आहे. म्हणून यालाच नाते म्हणतात. कारण तुमचं नातं बदललं तरी चालेल पण तुम्ही कुणाचा हात धरलात तर शेवटच्या दिवसापर्यंत सोडत नाही.अशी माणसं समाजात फार कमी आहेत. माझ्या आईलाही याबद्दल माहित आहे. म्हणून ती माझाशी आणि माझ्या भावाशी भांडायची पण माझ्या वडिलांसोबत कधीच नाही. ते तिच्या आयुष्यात पर्वतासारखे आहेत.