महेश कोठारे दिसणार ह्या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 09:00 PM2019-01-03T21:00:00+5:302019-01-03T21:00:00+5:30
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे.
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. या कार्यक्रमाचे पहिले पर्व नुकतेच संपले असून प्रेक्षकांना दुसऱ्या पर्वाची गोड बातमी दिल्यावर पुन्हा एकदा तिच कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची कुतुहलता निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज असणाऱ्या या दुसऱ्या पर्वाचे दोन वेगळे फॉरमॅट आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचे जहागिरदार’ हा फॉरमॅट असून महेश कोठारे या दोन दिवसांचे परफॉर्मन्सचे परीक्षण करणार आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर,
पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे हे सहा सेलिब्रिटी कलाकार आणि ८ नवीन विनोदी कलाकार एकत्र परफॉर्मन्स करणार आहेत. आणि या दुसऱ्या पर्वाच्या शेवटी महेश कोठारे दोन ‘कॉमेडीचे जहागिरदार’ ठरवणार आहेत.
मंगळवारनंतर मनोरंजनाची गाडी चालू ठेवत सर्व कलाकार मंडळी बुधवार आणि गुरुवारला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- रथी महारथींचा हास्यकल्लोळ’ करणार आहेत. कार्यक्रमाच्या या दुसऱ्या सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेते या दोन दिवसांत स्किट सादर करणार आहेत. या फॉरमॅटचे परीक्षण सई ताम्हणकर आणि
प्रसाद ओक करणार असून ‘परफॉर्मर ऑफ दि विक’ देखील तेच निवडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये सेलिब्रिटी जोडी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड, अरुण कदम, श्याम राजपुत आणि सुलेखा तळवळकर, अंशुमन
विचारे, रोहित चव्हाण आणि रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे आणि वनिता खरात, श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर अशी असणार आहे. तसेच, होस्ट आणि दोस्त असलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या नटखट स्वभावाने या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. त्यामुळे दुसरे पर्व तितक्याच ताकदीने पुन्हा प्रेक्षकांसाठी हजर होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने झाली असून प्रेक्षकांना दुसरे पर्व ७ जानेवारीपासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.