नवऱ्याची लफडी पाहण्यातच लोकांना रस; 'सावित्री ज्योती' मालिका बंद झाल्याने महेश टिळेकर संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 18:09 IST2020-12-21T17:52:21+5:302020-12-21T18:09:07+5:30
इतकी चांगली मालिका केवळ टीआरपी नसल्याने बंद होत असल्याने दिग्दर्शक महेश टिळेकर संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

नवऱ्याची लफडी पाहण्यातच लोकांना रस; 'सावित्री ज्योती' मालिका बंद झाल्याने महेश टिळेकर संतापले
सावित्री ज्योती ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. पण असे असले तरी केवळ टीआरपी नसल्याने ही मालिका लवकरच बंद होणार आहे. इतकी चांगली मालिका केवळ टीआरपी नसल्याने बंद होत असल्याने दिग्दर्शक महेश टिळेकर संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कश्याला म्हणायचं असा प्रश्न पडावा पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे कलाकार. बरेचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रियालिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच.
अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही.
सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?
महेश टिळेकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून तुमचे मत योग्यच असल्याचे अनेकजण त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत तर अनेकांनी त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.