‘चोरी’च्या आरोपाने संतापली माहिरा शर्मा; दादासाहेब फाळके पुरस्काराच्या वादावर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:36 AM2020-02-25T11:36:34+5:302020-02-25T11:36:57+5:30
माझ्यावरचे सर्व आरोप निराधार व खोटे असल्याचे माहिराने म्हटले आहे.
बिग बॉस 13 ची माजी स्पर्धक माहिरा शर्मावर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा बनाव रचल्याचा आरोप झाला आणि सगळ्यांचा धक्का बसला. आता माहिराने या सगळ्या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे.
होय, ऑफिशिअल स्टेटमेंटद्वारे माहिराने आपली बाजू मांडली आहे. माझ्यावरचे सर्व आरोप निराधार व खोटे असल्याचे माहिराने म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या स्टेटमेंटमध्ये ती म्हणते, ‘माझ्यावरच्या आरोपांमुळे मी दु:खी आहे. खुद्द दादासाहेब फाळके अवार्ड टीमशी संबंधित पर्पल फॉक्स मीडियातून माझ्या मॅनेजरला कॉल आला होता. या प्रतिष्ठित सोहळ्यात मला ‘बिग बॉस 13’ची सर्वाधिक फॅशनेबल कंटेस्टंटचा अवार्ड मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. इव्हेंटमध्ये मला हा अवार्ड देण्यात आला. खूप गर्दी असल्याने स्टेजवर हा पुरस्कार प्रदान केल्या जाऊ शकणार नाही, असे आम्हाला तेव्हा सांगण्यात आले होते. ’
काय आहे प्रकरण
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ( DPIFF) चे बनावट प्रशस्तीपत्रक बनवल्याचा आरोप माहिरा शर्मावर ठेवण्यात आला होता. DPIFFच्या अधिकृत टीमने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करून माहिरा शर्मावर बनावट प्रशस्तीपत्रक बनवल्याचा आरोप केला होता. अलीकडे मुंबईत दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2020 पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर माहिराने इन्स्टाग्रामवर या पुरस्कारस्वरूप देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्राचा फोटो शेअर केला होता. ‘मोस्ट फॅशनेबल कंटेस्टंट ऑफ बिग बॉस 13’साठी हा पुरस्कार मिळाल्याचा दावा माहिराने केला होता. यानंतर दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत टीमने माहिराचा हा दावा खोटा ठरवत, तिने शेअर केलेले प्रशस्तीपत्र बनावट असल्याचा प्रतिदावा केला. आमच्या कुठल्याही टीम मेंबरने माहिराला हे प्रशस्तीपत्र दिलेले नाही. या कृत्यासाठी माहिराने दोन दिवसांच्या आत माफी मागावी. अन्यथा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे DPIFFने म्हटले होते.