अशा व्यवस्थांचा मी निषेध करते; ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा Kiran Maneना पाठींबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:20 AM2022-01-16T10:20:14+5:302022-01-16T10:21:11+5:30
Kiran Mane Controversy : एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांचा बाजूने आहे, अशी सुरूवात करत तिने किरण मानेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.
Kiran Mane Controversy : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलासची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने ( Kiran Mane) यांना राजकीय भूमिका घेतल्यानं तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आलं. यानंतर या प्रकरणावर महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि नेते मंडळींनी या कारवाईचा निषेध करत किरण मानेंना पाठींबा जाहिर केला आहे. आता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) हिनेही किरण माने यांची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे. एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांचा बाजूने आहे, अशी सुरूवात करत तिने किरण मानेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.
ती लिहिते...
एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे . अश्या निर्मिती संस्था आणि चॅनल ह्यांनी त्या कलाकाराला कामा वरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अश्या व्यवस्थांचा मी निषेध करते.
व्यवस्था समजून घेणे ,व्यवस्थेला प्रश्न विचारणे ,आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे असच मी मानते. त्या बाबत किरण माने ह्याचे कौतुक आहे. एखाद्यस व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो ,चर्चा करू शकतो.. मात्र त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे, अशा आशयाची पोस्ट अनिता दाते यांनी दिली आहे.
दरम्यान अनिता दातेच्या या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी अनिता दातेच्या पोस्टचं समर्थन केलं आहे तर काहींनी यावरून अनिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनिता दाते हिच्याआधी दिग्दर्शक समीर विद्वांसने पोस्ट शेअर करत किरण मानेंना पाठींबा दिला होता. कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे, असंट्वीट समीर विद्वांसने केलं होतं.