विघ्नहर्ता गणेश या मालिकेत मलखान सिंह दिसणार या रूपात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:30 AM2019-04-21T06:30:00+5:302019-04-21T06:30:02+5:30
विघ्नहर्ता गणेश या मालिकेच्या पुढील कथानकात भगवान शिवाच्या 19 अवतारांची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील विघ्नहर्ता गणेश मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे आणि लॉन्च झाल्यापासून या मालिकेला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत आकांक्षा पुरी असून शिवाची भूमिका मलखान सिंह साकारत आहे. या मालिकेमुळे मलखान सिंहला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या सशक्त अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत तो आता भगवान शिवाच्या एक नाही तर विविध 19 अवतारांमध्ये दिसणार आहे. आत्तापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात त्याला यश आले आहे.
विघ्नहर्ता गणेश ही भारतात व्यापक प्रेक्षकवर्ग लाभलेली पौराणिक मालिका आहे, ज्यामध्ये गणेश या हिंदू देवतेच्या अज्ञात अशा कथा गुंफलेल्या आहेत. यातील कथानकात आता आणखी एक रोमांचक वळण येणार आहे आणि त्यात भारतीय टेलिव्हिजनवर प्रथमच शिवाच्या 19 अवतारांचे अवतरण होणार आहे.
या मालिकेत भगवान गणेशाच्या जन्मापासून ते त्यांच्या जीवनातील सर्व रूपांचे चित्रण करण्यात आले आहे. याच्या पुढील कथानकात भगवान शिवाच्या 19 अवतारांची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवाचा सर्वात पहिला अवतार पिप्पलाद असणार आहे. तो महर्षी दधीचीचा पुत्र होता. महर्षी दधीचींनी आपले संपूर्ण आयुष्य शिवभक्तीत व्यतीत केले होते आणि त्याबद्दल वरदान म्हणून शिवाने त्यांच्या पुत्राच्या रूपात जन्म घेतला.
या विविध रूपांबाबत मलखान सिंह सांगतो, “सर्वच्या सर्व 19 अवतार साकारणे हे नक्कीच आव्हानात्मक आहे, पण त्याच वेळी अशी संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित साकारण्यासाठी मी आणि आमची टीम ही पूर्ण खातरजमा करून घेऊ की, त्यावर सखोल संशोधन केलेले असेल आणि चुकीची माहिती आमच्याकडून सादर होणार नाही. जेणेकरून भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. मला आशा आहे की, मी जो प्रयत्न करत आहे, त्यावर प्रेक्षक देखील प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करतील.”
विघ्नहर्ता गणेश ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार 7.15 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळते.