"घरभाडं द्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते, पण...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' कटू प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:13 PM2023-07-12T14:13:12+5:302023-07-12T14:17:20+5:30
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याने शेअर केला अनुभव
छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत घराघरात पोहोचला. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेबरोबरची त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अजिंक्यने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मन उडू उडू झालं' या मालिकेबरोबरच विठू माऊली मालिकेत त्याने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्यने त्याच्या कलाविश्वातील प्रवासाबाबत भाष्य केलं.
अजिंक्यने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत एक कटू अनुभवही सांगितला. तो म्हणाला, "माझ्या आयुष्यात एकवेळ अशी होती, जेव्हा माझ्याकडे घराचं भाडं द्यायलाही पैसे नव्हते. पण मी वाट बघण्याचा निर्णय घेतला. फक्त विविधांगी भूमिका असलेले चांगले प्रोजेक्ट करायचे, असं मी ठरवलं होतं. यादरम्यान मला आर्थिक चणचण भासली. पण, चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहत असतात."
"वहिनींना नमस्कार", सोहम बांदेकरचा 'त्या' मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला...
"लॉकडाऊननंतर मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण, योग्य संधीची मी वाट पाहत होतो. आणि त्यानंतर मला मन उडू उडू झालं ही मालिका मिळाली. मी कसाआहे, हे या मालिकेमुळे सगळ्यांना कळलं. विठू माऊली मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारल्यानंतर माझ्यातील कलाकाराची दुसरी बाजू प्रेक्षकांना दाखवण्याची संधी मला हवी होती. इंद्रा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, याचा मला आनंद आहे," असंही पुढे अजिंक्य म्हणाला.
३१ वर्षांपूर्वीच झालेली किंग खान सुपरस्टार होणार असल्याची भविष्यवाणी, हेमा मालिनी यांचा खुलासा
अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता तो नव्या भूमिकेतून भेटीला येत आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत अजिंक्य राजवीर ही भूमिका साकारताना दिसणार आहे. १७ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर या मालिकेचं प्रक्षेपण होणार आहे.