मन उडू उडू झालं: 'मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा'; अरुण नलावडे यांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 07:15 PM2021-12-28T19:15:00+5:302021-12-28T19:15:00+5:30
Arun nalawade: गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात सक्रीय असलेल्या अरुण नलावडे यांनी 'मन उडू उडू झालं' या मालिकेत दिपूच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल सुरु असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशाही काही सीरिअल्स असतात ज्या अल्पावधीत लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं' (man udu udu zal). अभिनेत्री हृता दुर्गुळे (hruta durgule) हिची मुख्य भूमिका असलेली ही मालिका कमी कालावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हृतासोबतच तिच्यासोबत झळकलेले कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागले आहेत. त्यातलाच एक दिग्गज कलाकार म्हणजे अरुण नलावडे. गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात सक्रीय असलेल्या अरुण नलावडे (arun nalawade) यांनी या मालिकेत हृताच्या म्हणजेच दिपूच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अलिकडेच या मालिकेविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी ते व्यक्त झाले आहेत.
'मन उडू उडू झालं' या मालिकेत अरुण नलावडे यांनी दिपूच्या बाबांची म्हणजेच देशपांडे सर ही भूमिका साकारली आहे. कायम सत्याच्या मार्गावर मानाने चालणारे देशपांडे अशी त्यांची ओळख आहे. त्याचसोबत ते प्रेमळ वडीलदेखील असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच या भूमिकेविषयी त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
"खऱ्या आयुष्यात मलाही मुलगीच आहे. त्यामुळे एका मुलीचे वडील होण्याचा आनंद आणि जबाबदारी या दोघांचाही मला अनुभव आहे. मुलगा -मुलगी असा भेद न करणाऱ्या देशपांडे सरांची भूमिका मी मन उडू उडू झालं या मालिकेत साकारतोय. संस्कार करताना कठोर, तर मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा मी यात साकारतोय. सगळं गोड-गोड किंवा फक्त नकारात्मक असं न दाखवता परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भावनांतून व्यक्त होणारे बाबा असल्यामुळे प्रेक्षकांना ते आपल्यातलेच एक वाटतात," असं अरुण नलावडे म्हणाले.
दरम्यान, अरुण नलावडे यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते. 'श्वास', 'रास्ता रोको', 'ही पोरगी कोणाची?', 'बाईमाणूस', 'गोजिरी' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 'अवघाची संसार', 'का रे दुरावा', 'स्वप्नांच्या पलिकडले', 'नातीगोती' अशा अनेक मालिकांमध्येही ते झळकले आहेत.