'मन उडू उडू झालं' फेम दीपू उर्फ हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहचं लवकरच शुभमंगल सावधान?, खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:27 PM2022-04-15T14:27:13+5:302022-04-15T14:27:36+5:30
Hruta Durgule : हृता दुर्गुळे मालिकेशिवाय बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सध्या तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत तिने दीपूची भूमिका साकारली आहे आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. हृता मालिकेशिवाय बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सध्या तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र आता याबाबतचा खुलासा अभिनेत्रीनं लोकमतकडे केला आहे.
सोशल मीडियावर हृता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतीक शाह पुढील महिन्यात म्हणजेच मे, २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबतचा खुलासा हृताने केला आहे. याबाबत ती म्हणाली की, या चर्चेत अजिबात तथ्य नाही. अजून आमचं लग्नाबाबत काहीही ठरलेले नाही. १० जून रोजी माझा चित्रपट अनन्या रिलीज होतो आहे. त्यामुळे इतक्यात आमचं लग्नाबाबत काहीही ठरलेले नाही. आमच्या लग्नाच्या डेटबद्दल जी माहिती समोर येत आहे, ती चुकीची आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने अखेर लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. हृता आणि प्रतीक शाहचा डिसेंबर, २०२१ मध्ये साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. प्रतीक शाह हा छोट्या पडद्यावरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.