'मला वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच..'; कथित बॉयफ्रेंडविषयी मानसी नाईकचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:03 AM2024-04-15T09:03:46+5:302024-04-15T09:03:46+5:30
Manasi naik: काही काळापूर्वीच मानसीने प्रदिप खरेरा याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक (manasi naik) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. काही काळापूर्वीच मानसीने प्रदिप खरेरा याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कथित बॉयफ्रेंडविषयी भाष्यदेखील केलं. यामध्येच आता तिच्या आयुष्यातील त्या स्पेशल व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अलिकडेच मानसीने पॅरिसमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. मानसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला आयफेल टॉवरच्या इथे नेण्यात आलं होतं. याचबरोबर मानसीला फॉसिल वॉच बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालं होतं. त्यामुळे हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या विषयी प्रश्न विचारण्यात आला. याविषयी बोलत असताना तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं.
"मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण, बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायला काहीही करु शकतो", असं मानसीने यावेळी सांगितलं. त्यानंतर नुकतीच मानसीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने त्या खास व्यक्तीचा फोटो रिपोस्ट करु त्याला खास कॅप्शन दिलं आहे.
“माझं प्रेम मी एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे” असं कॅप्शन देत तिने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे आयफेल टॉवरसमोर उभे असून त्यांनी छान सेल्फी क्लिक केला आहे.
कोण आहे मानसीचा कथित बॉयफ्रेंड?
मानसीच्या कथित बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव असल्याचं सांगण्यात येतं. मानसीने अद्यापतरी राहुलसोबत असलेल्या नात्यावर उघडपणे भाष्य केलेलं नाही. वा, त्यांच्या अफेअरच्या होत असलेल्या चर्चांना दुजोराही दिलेला नाही. मात्र, लवकरच ती याविषयीची माहिती चाहत्यांना देणार असल्याचं तिने मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.
कोण आहे राहुल खिस्मतराव?
मानसीचा कथित बॉयफ्रेंड राहुल खिस्मतराव हा अंतराळ शास्त्रज्ञ असून मानसीदेखील त्याच्यासोबत जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचं म्हणाली. जर्मनीत गेल्यावर अभिनेत्री पूजा सावंतला आमंत्रण असेल आणि सगळं मराठमोळं असेल, असंही ती अप्रत्यक्षपणे म्हणाली. लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल मानसी हे सगळं म्हणतेय अशा या वक्तव्यावरून समजलं जात आहे.