"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 07:47 PM2024-06-02T19:47:47+5:302024-06-02T19:48:23+5:30
आशुतोषचे आजोबा विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्यावर संघाचा पगडा होता.
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale) राजकारणी कुटुंबातून येतो हे खपू कमी जणांना माहित असेल. तर त्याचे आजोबा विद्याधर गोखले हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्यावर संघाचा पगडा होता. पण आशुतोष गोखलेचे विचार याउलट आहेत. तो डाव्या विचारसरणीचा असून संघाचे विचार अजिबात पटत नाहीत असं मत त्याने व्यक्त केलं.
आशुतोष गोखले सध्या 'जर तरची गोष्ट' नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत. नुकतंच त्याने राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. तसंच लहानपणापासून त्याच्यावर कसे राजकीय संस्कार झाले हेही त्याने सांगितलं. "कॉकटेल स्टुडिओ" या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष म्हणाला, "मी डाव्या विचारांचा आहे हे कन्फर्म आहे. अण्णा संघात होते. बरं मीही संघाच्या शाखेत गेलो आहे. जबरदस्ती नेलंय असंही नाही झालंय. मी व्यवस्थित दोन वर्ष शाखेत गेलो आहे.तिथे असतानाही मला त्यातलं काहीच पटायचं नाही. मला ते विचार कधी पटलेच नाहीत. ११-१२वीत असताना मी शाखेत जायचो, त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. ज्या काही चांगल्या बाजू आहेत आवडलेल्या गोष्टी या आहेत. पण मला त्यांचे राजकीय विचार पटले नाहीत. त्यामुळे मी डाव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे आत्ता जे काही चाललंय त्यातल्या बहुतांश गोष्टी मला नाहीच पटत."
"अण्णा जरी शिवसेनेचे असले तरी माझी ही मतं स्वत:हून झाली असतील असं नाहीए. आता १०वीत तसं काय कळतंय. पण ११वी १२वीत शाखेत जाताना मला कळत होतं की मला हे पटत नाहीए कारण घरात माझ्या तसंच वातावरण होतं. अण्णा जरी शिवसेनेचे खासदार होते, संघाचा पगडा होता तरी ते कधीच सक्रीय राजकारणात नव्हते. तो त्यांचा हेतू कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी अण्णांना विनंती केली होती की तुम्ही या भागातून उभे राहा तुम्हाला उमेदवारी द्यायची आमची इच्छा आहे. बाळासाहेबांना नाही म्हणायची त्यांची इच्छा नव्हती. कारण त्यांना एक क्लीन माणूस हवा होता त्यात माझे आजोबा होते. पण असं असूनही लहानपणापासून जे वातावरण होतं त्यातूनच माझे विचार असे आहेत. आज घरातलं वातावरण बदललंय. २०१४ नंतर तर ते खूपच बदलत गेलं. माझी अत्यंत लिबरल आई २०१४ नंतर थोडीथोडी बदलत गेलेली मी पाहिली आहे. माझ्या घरात माझे आणि आईबाबांचे खूप वाद होतात कारण त्यांना सध्या जे चालू आहे ते बरोबर वाटतंय आणि मला साफ चुकीचं वाटतंय. तर मी १०० टक्के उजव्या विचारसरणीचा नाही."