"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:13 PM2024-05-26T12:13:15+5:302024-05-26T12:13:44+5:30
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने अपघात आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
सध्या राज्यात पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने रविवारी(१९ मे) मद्यप्राशन करत गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला. या हाय प्रोफाईल प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनीही याबाबत पोस्ट शेअर करत त्यांचं मत मांडलं आहे. आता माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने अपघात आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
अभिजीत खांडकेकरने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या युट्यब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "ट्राफिकचे नियम न पाळणाऱ्या लोकांबद्दल मला राग येतो. तुमच्याही बाबतीत असं होत असेल. मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे. माझ्या वडिलांना रस्त्यात कोणी ओरडून बोललं तर ते त्याकडे दुर्लक्ष करून निघून जायचे. पण, मग दुसरीकडे अशाही व्यक्ती मी पाहिलेल्या आहेत ज्या आपल्या माणसांची बाजू घेतात. ए काय बोलला? माझ्या भावाला काही बोलायचं नाही...असे लोकही मी पाहिलेले आहेत. माझ्या आयुष्यात माझी बाजू घेणारं मोठा भाऊ किंवा बहीण कोणीच नव्हतं. आज मी जे काही आहे ते माझ्या अनुभवांमुळे आहे. जी शिस्त मी पाळतो त्याच्या उलट कोणी वागत असेल तर मला भयंकर राग येतो. खासकरून रस्त्यांवर...".
"भारतात किंवा मुंबईत ट्राफिकची परिस्थिती किती वाईट आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कुणाच्या तरी चुकीमुळे एखादा अपघात होतो. कुणाला तरी आयुष्यभराचं अपंगत्व येतं. कुणाला तरी जीव गमवावा लागतो. कुणाच्या तरी जवळची व्यक्ती जीवानीशी मुकते. मी माझी लेन फॉलो करतोय. मी RTOमध्ये जी परिक्षा देऊन जे लायसन्स मिळवलं आहे. कदाचित तीच परिक्षा देऊन तूदेखील ते लायसन्स मिळवलं असशील. तुलाही ते नियम माहीत आहेत किंवा असायला पाहिजे. जो रोज गाडी चालवतो त्याला हे माहीत असतं की कट मारल्यावर दुसरा गडबडेल, त्याचा अपघात होऊ शकेल. या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असतानाही आपण त्या करतो. आणि मला याचा भयंकर राग येतो. त्यामुळे ज्यांना वाटतं की मी चॉकलेट बॉय वगैरे आहे. अशावेळी माझं रौदरुपही बाहेर आलेलं आहे. एक दोन वेळा अशी भांडणं विकोपालाही गेलेली आहेत. समोरची व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता मी एका बुक्कीत गाडीचं बोनेट वाकवलेलं आहे. आरसेही फोडलेले आहेत," असंही त्याने पुढे सांगितलं.