सारं काही तिच्यासाठी: 8 वर्षानंतर अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; साकारणार 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 04:13 PM2023-08-21T16:13:08+5:302023-08-21T16:14:01+5:30
Ashok shinde: अशोक शिंदे बऱ्याच वर्षांनी झी मराठीवर पुनरागमन करत आहेत.
छोट्या पडद्यावर सध्या 'सारं काही तिच्यासाठी' या नव्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. ही गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. या मालिकेत खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत या मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता अशोक शिंदे हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले असून जवळपास ८ वर्षांनी ते झी मराठीवर कमबॅक करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी अलिकडेच त्यांच्या भूमिकेविषयी भाष्य केलं.
या मालिकेमध्ये अशोक शिंदे यांनी उमाच्या (खुशबू तावडे) नवऱ्याची रघुनाथ खोत यांची भूमिका साकारली आहे. रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत.
"या मालिकेच्या निमित्ताने मी जवळपास ८ वर्षांनी झी मराठीवर पुनरागमन करत आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे, जवळ जवळ १७० सिनेमात नायक खलनायक म्हणून काम केले आहे. माझी ही झी मराठी वरची मालिका आहे ती १०६ वी मालिका आहे. आज पर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवरती काम केली. झी मराठीशी माझा नातं अल्फा गौरवपांसून आहे", असं अशोक शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मला माझा पहिला अभिनय पुरस्कार मिळाला तो अल्फा गौरव मध्ये. आता पुन्हा झी मराठीने मला हे सुंदर पात्र साकारण्यासाठी आणि झी मराठीचा एक भाग होण्याची संधी दिली आहे. ही एकंदरीत एक छान भावना आहे. मला ही अप्रतिम मालिका दिल्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे."
दरम्यान, उमा तळकोकणात सासरी नांदत आहे. तर, तिची धाकटी बहीण संध्या तिच्या लेकीसोबत लंडनमध्ये राहते. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी".