पानटपरी चालवून भाऊ कदमने केला कुटुंबाचा सांभाळ; स्ट्रगल स्टोरी वाचून येईल डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 02:37 PM2024-03-03T14:37:43+5:302024-03-03T14:38:48+5:30
Bhau kadam: अनेक खाचखळगे पार करत त्यांनी ही लोकप्रियता आणि स्टारडम मिळवला आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम (bhau kadam). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर भाऊ कदमने अपार लोकप्रियता मिळवली. रिअॅलिटी शो करण्यासोबत ते अनेक सिनेमांमध्येही झळकले आहेत. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक खाचखळगे पार करत त्यांनी ही लोकप्रियता आणि स्टारडम मिळवला आहे. एक काळ असा होता जेव्हा भाऊ कदम पानटपरी चालवून उदरनिर्वाह करायचे.
आज भाऊ कदम त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चिल्या जात आहेत. यामध्येच त्यांच्या स्ट्रगल काळाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
वडिलांच्या निधनानंतर घ्यावी लागली कुटुंबाची जबाबदारी
भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं. त्यांचे शालेय शिक्षणदेखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झालं. वडिलांच्या अकाली निधनानंतर भाऊंना वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबियांसोबत डोंबिवलीत राहायला गेले. घर खर्च चालवण्यासाठी सुरुवातीला त्यांनी मतदार नावे नोंदणीच्या कामाला सुरुवात केली. हेच काम करत असताना त्यांनी भावासोबत याच भागात पानटपरी सुरु केली.
मतदानाची कामं, पान टपरी हा रहाटगाडा ओढत असतानाच त्यांनी त्यांच्यातील अभिनयाची आवडी जोपासली. त्या काळात ते नाटकांमध्येही काम करत होते. भाऊ कदम यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याकाळी त्यांचं ‘जाऊ तिथे खाऊ’ हे नाटक तुफान गाजलं. या नाटकानंतर त्यांच्या करिअरला चालना मिळाली.
नाटकामुळे मिळाली करिअरला दिशा
सुरुवातीला भाऊ कदम यांना नाटकात काम करण्यासाठी १०० रुपये मिळायचे. हळूहळू या मानधनात वाढ झाली. विशेष म्हणजे उत्तम अभिनयशैली आणि मेहनत करायची तयारी यांच्या जोरावर भाऊ कदम यांनी लोकप्रियता मिळवली. आज ते एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये मानधन घेतात.