"तेव्हा मला भीती वाटली...", देवदत्त नागेने सांगितला 'देवयानी' मालिकेदरम्यानचा किस्सा, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:27 IST2025-04-18T13:24:01+5:302025-04-18T13:27:10+5:30
'जय मल्हार', 'देवयानी' या मालिकेमुळे अभिनेता देवदत्त नागे घराघरात पोहोचला.

"तेव्हा मला भीती वाटली...", देवदत्त नागेने सांगितला 'देवयानी' मालिकेदरम्यानचा किस्सा, काय घडलं?
Devdatta Nage: 'जय मल्हार', 'देवयानी' या मालिकेमुळे अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) घराघरात पोहोचला. अभिनेत्याने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे. देवदत्तने 'आदिपुरुष' सिनेमात साकारलेली हनुमानाची भूमिका चांगलीच गाजली. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने 'देवयानी' मालिका करतानाचा एक किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच देवदत्त नागेने 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, "मला भीती एकदाच वाटली होती, तेव्हा मी देवयानी करत होतो. देवयानी करताना त्याच्यामधील सम्राट विखे पाटील म्हणजेच भैय्याराव साकारताना जो अठ्ठल दारूडा, त्याची ६-७ लग्नझालेली होती, जो आई-वडिलांना त्रास द्यायचा. फक्त तो खूप इमोशनल होता. कारण त्या सम्राटरावकडे दूर्लक्ष झालं होतं, म्हणून तो तसा वागत होता असं दाखवण्यात आलं होतं. ते पात्र ग्रे शेड असणारं होतं. ते करताना मला 'जय मल्हार' मालिका मिळाली. तसेच त्या मालिकेचं शूटिंग लगेचच २० दिवसांत सुरु होणार होतं आणि लवकरच टेलिकास्ट करण्यात येणार होतं."
पुढे अभिनेता म्हणाला, "त्यावेळी मला प्रचंड भीती वाटली होती कारण ज्या लोकांनी सम्राटराव पाहिला आहे ते लोक मला देवाच्या रुपात स्विकारतील का? असं वाटत होतं. त्यानंतर मी रात्री एक-दीडच्या सुमारास आमचे जे लेखक, क्रिएटिव्ह होते त्यांना मी फोन केला आणि रडत होतो. मग त्यांना म्हटलं सर मला खूप भीती वाटते उद्या पहिला एपिसोड आहे, पण लोकं मला स्विकारतील का? तेव्हा त्यांनी मला खूप समजावलं. असा खुलासा अभिनेत्याने केला.