'लाखात एक आमचा दादा' मालिकेत गिरिश ओक यांची एन्ट्री, डॅडींच्या भूमिकेत दिसणार, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:36 PM2024-07-02T13:36:58+5:302024-07-02T13:37:44+5:30
'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. मालिकेत प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची एन्ट्री झाली आहे.
सध्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच आता मालिकेत प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची एन्ट्री झाली आहे. यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीणच वाढली आहे.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गिरीश ओक दिसत आहे. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत गिरीश ओक खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेत ते डॅडी ही भूमिका साकारणार आहेत. जालिंदर निंबाळकर या व्यक्तिरेखेतून गिरीश ओक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेचा प्रोमो पाहून या मालिकेत गिरीश ओक एक डॅशिंग आणि रुबाबदार तसंच कठोर व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्तिरेखा साकारणार असल्याचं दिसत आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला गिरीश ओक साकारत असलेल्या डॅडींचा निंबाळकर वाडा दिसत आहे. एक व्यक्ती या प्रोमोमध्ये डॅडींच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना दिसत आहे. कठोर व्यक्तिमत्त्व असणारे डॅडी गावासाठी मात्र देवमाणूस असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या प्रोमोमध्ये डॅडी तुळजाच्या कानाखाली मारत असल्याचं दिसत आहे. "आमची इज्जत सगळ्यात वर...ती वाचवण्यासाठी कोणाचा जीव घ्यायला लागला तरी फरक पडत नाय", असंही ते म्हणताना दिसत आहे. या प्रोमोमुळे मालिका सुरू होण्याआधीच त्यातील ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
चार बहिणींची लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची शपथ घेतलेल्या सूर्यादादाची भूमिका नितीश चव्हाण साकारणार आहे. तर अभिनेत्री दिशा परदेशी या मालिकेत तुळजा ही भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चार जणी सूर्या दादाच्या बहिणींची भूमिका साकारणार आहेत. ही मालिका ८ जुलैपासून झी मराठीवर टेलिकास्ट केली जाणार आहे.