'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:34 PM2024-11-28T14:34:24+5:302024-11-28T14:35:17+5:30
'या सुखांनो या', 'वहिनीसाहेब' या गाजलेल्या मालिकांमध्येही तो दिसला. १० वर्ष कुठे गायब होता अभिनेता?
'या सुखांनो या', 'वहिनीसाहेब' अशा अनेक मालिकांमध्ये झळकलेला तसंच 'फॉरेनची पाटलीण' या सिनेमात दिसलेला मराठी अभिनेता गिरीश परदेशी (Girish Pardeshi) आठवतोय का? गिरीश परदेशीने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. मालिका, नाटक, नृत्य अशा प्रत्येक क्षेत्रात तो अग्रेसर होता. तब्बल १० वर्षांनी गिरीश टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. मात्र इतके वर्ष तो कुठे गायब होता आणि त्याने ब्रेक का घेतला याचं कारण सांगितलं आहे.
गिरीश परदेशी स्टार प्रवाहवरील महेश कोठारे निर्मित एका मालिकेतून पुनरागमन करत आहे. २०१४ नंतर तो कुठेच दिसला नव्हता. 'अल्ट्रा बझ'ला दिलेल्या मुलाखतीत गिरीश म्हणाला, "मी शेवटची मालिका ही महेश कोठारे सरांचीच केली होती. 'जयोस्तुते' असं मालिकेचं नाव होतं. २०१४ साली ही मालिका आली होती. त्यापूर्वी अनेक वर्ष मी काम करतच होतो. १९९९ ते २०१४ मी टीव्हीवर चांगल्या भूमिका केल्या. पण कुठेतरी मला साचलेपण यायला लागलं. तेच तेच करतोय असं वाटायला लागलं. मग कलाकार म्हणून मला माझी समृद्धता एक्स्प्लोर करायची होती. पण मालिका केल्या नाही तर पैसे कुठून कमावणार असाही विचार होता."
गिरीश पुढे म्हणाला, "मग मी थिएटरकडे मोर्चा वळवला कारण माझ्याकडे थिएटरचं ट्रेनिंग होतं. मी प्रशिक्षणाचं खूप काम केलं. या १० वर्षात मी आयुष्याची वेगळी बाजू पाहिली. मी प्राज्य विद्यामध्ये पारंगत झालो. MA IN INDOLOGY असं त्याला म्हणतात. म्हणजेच अश्मयुगीन भारत, सिंधू संस्कृती, वेद कालीन भारत तिथपासून १२ व्या शतकातला भारत त्याची संस्कृती, तत्वज्ञान याचा अभ्यास केला. शिवाय अय्यंगार योगाचं प्रशिक्षण घेतलं. असं मेनस्ट्रीम सोडून बाकी बाजू बघितल्या. एक दिवस महेश कोठारे सरांच्या ऑफिसमधून एका भूमिकेसाठी फोन आला. मग वाटलं की चला परत एकदा आपल्या घरी म्हणजेच टेलिव्हिजनवर जाऊया असं म्हणत मी कमबॅक केलं."
गिरीश परदेशी स्टार प्रवाहवरील 'उदे गं अंबे उदे' या मालिकेतून कमबॅक करत आहे. आजही त्याचा तोच गोड चेहरा आहे जो पूर्वी मालिकांमध्ये प्रेक्षक बघत होते. बऱ्याच वर्षांनी त्याला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.