'हातची नोकरी गेली, सेव्हिंगचेही पैसे संपले'; अशी झाली अधिपतीची सिनेसृष्टीत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:04 PM2023-08-29T17:04:26+5:302023-08-29T17:04:56+5:30
Hrishikesh Shelar: ऋषिकेशचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अभिनेता होण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगला धडा. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील अधिपतीचा रांगडेपणा पण तितकाच त्याचा प्रेमळ स्वभाव प्रेक्षकांना आपलंसं करत आहे. अधिपती ही भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार साकारत आहे. या मालिकेपूर्वी ऋषिकेश सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत झळकला होता. उत्तम अभिनयशैलीमुळे ऋषिकेशने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
ऋषिकेशचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अभिनेता होण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. ऋषिकेश सांगलीमध्ये लहानाचा मोठा झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या ऋषिकेशची आई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. तर, वडील फार्मासिस्ट आहेत. ऋषिकेशला लहानपणापासून अभिनयाची आवड. त्यामुळे त्याने अनेक बालनाट्यांमध्ये काम केलं. ऋषिकेशला अभ्यासात फारशी गोडी नव्हती. मात्र, आई-वडिलांच्या सांगण्यावरुन त्याने एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने इरफान खानवरुन ठेवलं लेकीचं नाव; कारण सांगत म्हणाला...
एकीकडे शिक्षण घेत असताना ऋषिकेश नाटकांमध्येही काम करत होता. त्यामुळे नाट्यस्पर्धा, एकांकिका करत असताना तो राज्यभरात दौरे करु लागला. नाटकाची हीच ओढ त्याला मुंबईपर्यंत घेऊन आली. ऋषिकेश एकीकडे नोकरी करत होता. तर, दुसरीकडे नाटकात काम करत होता.
दरम्यान, अभिनयाच्या ध्येयाने झपाटलेल्या ऋषिकेशने नाटकासाठी हातची नोकरी सोडली. परिणामी, ठराविक काळानंतर त्याच्याकडे असलेलं सेव्हिंगही संपलं. शेवटी त्याला आई वडिलांची मदत घ्यावी लागली. पालकांच्या मदतीने त्याने मुंबईत थिएटर आर्ट्स जॉईन केले. यातूनच त्याला शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक मिळालं. पुढे मालिकांमधून ऋषिकेशला अभिनयाची संधी मिळाली. पहिल्याच मालिकेतून तो विरोधी भूमिकेत झळकला होता. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे तो प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेला दौलत हे पात्र खूप गाजले. त्यानंतर आता तो तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.