'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:51 PM2024-10-08T15:51:30+5:302024-10-08T15:52:20+5:30

बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (bigg boss marathi 5, suraj chavan)

marathi actor kiran mane post about suraj chavan bigg boss marathi 5 winner | 'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर अभिनेते किरण मानेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. किरण माने लिहितात. "मराठी मनोरंजन क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे कुणाला मिळावं याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत. टीव्ही रिॲलिटी शो मध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी, गोर्‍यापान, चलाख पोराला ट्राॅफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही... म्हणजे 'तो विनर नव्हताच' वगैरे ट्रोलींग होतं, पण 'होता है, चलता है' असं वाटून विषय संपतो. ..पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्राॅफी उचलली की लै गदारोळ होतो. '"

किरण माने पुढे लिहितात,  "गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय', 'त्याला हे यश टिकवताच येणार नाही' अशा टिप्पण्या सुरू होतात. 'आता दारिद्र्य दाखवुन रडारडी करा आणि ट्राॅफी मिळवा' अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्‍यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना 'उपरा' वाटतो. सुरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मुळ कारण हे आहे ! एक विसरू नका भावांनो, सुरज बिगबाॅसच्या घरात आला तेच मुळात स्वबळावर ! बिगबाॅसच्या ऑफरला सुरूवातीला 'नाही' म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता हे ही लक्षात घ्या. इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातला नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा."



किरण माने पुढे लिहितात, "अनेकांनी अशी टीका केलीय की सुरज खेळलाच नाही. तर बिगबाॅस हा 'टास्क' जिंकण्याचा खेळ नाही. बिगबाॅस हा विपरित परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या-बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे. म्हणून तर हिंदी-मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्राॅफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले... पण मनं जिंकलेले कित्येक लोक प्रेक्षकांच्या काळजात आहेत. अठरा वर्षांपुर्वी बिगबाॅस हिंदीचा पहिला सिझन राहुल राॅयनं जिंकला होता. पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एन्टरटेनमेन्ट क्विन आहे आणि रवि किशन भोजपुरीत सुपरस्टार आहे. सुरज ट्राॅफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता!"

 



किरण माने शेवटी लिहितात, "यश-प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे 'टॅलेन्ट' पाहिजे, अंगी 'कर्तृत्व' पाहिजे आणि 'संधी' मिळाली पाहिजे. या तिन्हीत सुरज यशस्वी ठरला. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते... ती दाखवली तर तो टिकेलही. किमान आत्ता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहोणार्‍या बदकांमध्ये गांवखेड्यातनं नितळ-निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला 'कुरूप वेडा' ठरवू नका. कदाचित आत्तापर्यन्तच्या काॅमेडियन्स, परफाॅरमर्स, एन्टरटेनर्सना बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक 'राजहंस' ठरू शकतो. लब्यू सुरज... होऊन जाऊदे झापुक झुपूक !"

Web Title: marathi actor kiran mane post about suraj chavan bigg boss marathi 5 winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.