"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:37 IST2024-11-25T14:37:05+5:302024-11-25T14:37:35+5:30
मराठी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करत EVM वर शंका उपस्थित केली आहे.

"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
Kiran Mane Post on Evm : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीने 239 जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निकालानंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मराठी कलाकाराही निकालावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता मराठी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करत EVM वर शंका उपस्थित केली आहे.
किरण माने याने दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. "दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर... हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त 2 मतं मिळाली! पत्नी, मुलगी, आई आणि ते स्वत: असे चार मतदार तर घरचेच होते. त्यांनीही मतदान केले नाही का? इव्हीएमबद्दल इतरही अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्यात. तमाम महाराष्ट्र जो संशय व्यक्त करतोय की, हे जनमतानं नाही तर 'धन'मताने निवडून आलेले असावेत... ही शंका खरी आहे की काय???" असे म्हणत किरण मानेने व्हिडीओ पोस्ट केला.
व्हिडीओमध्ये राजेश येरूणकर म्हणतात, "सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो. तिथे माझं घर, माझ्या घरात चार मते. माझी आई, पत्नी, मुलगी आणि मी. तिथे आम्हाला फक्त दोन मते पडलीत. माझ्या आईनं, पत्नीने आणि मुलीने मला मतदानचं केलं नाही? मी स्वत:ला मतदान केलं नाही? अशा प्रकारचा सगळा घोळ आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक यादीमध्ये दोन-दोन-तीन-तीन-नऊ-नऊ-दहा-दहा मतं फक्त. आणि आमचे कार्यकर्ते. त्यांच्या घरची मते नाही मिळाली का? असा घोळ आहे. काही मशीनचं चार्जिंग हे 99 टक्के आहे. दोन दिवस मशीन ठेवून चार्जिंग 99 टक्के कसे राहू शकते. संशयास्पद गोष्टी आहेत".
पुढे व्हिडीओमध्ये राजेश येरूणकर हे पोलिंग एजंटला त्यांचं मत मांडण्यास सांगतात. पोलिंग एजंट म्हणाल्या, "निवडणूक बंद करुन टाका. अतिशय संताप आलेला आहे. दरवर्षी असे होणार असेल तर अजिबात गरज नाही. मागच्या पाचवर्षांपुर्वी आमच्या ८ मशिन फ्रॉड निघालेल्या. तिकडे नंबर वेगळे. आमच्या पोलिंग एंजटचा नंबर वेगळा. तरीही हे लोक म्हणतात प्रकिया आहे. असंच करायला लागेल. आता आक्षेप घेतला तर जिल्हाअधिकारी ऐकायला तयार नाही".