'पहिल्यांदा तिची किंमत मला कळली'; जवळच्या व्यक्तीसाठी किरण मानेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:50 PM2022-07-25T13:50:44+5:302022-07-25T13:51:33+5:30

Kiran mane: किरण माने यांनी बालपणीच्या काही आठवणी जागवल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत असताना बहीण आपल्या चुगल्या कशा आईला सांगायची हेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

marathi actor kiran mane shared childhood memory with sister | 'पहिल्यांदा तिची किंमत मला कळली'; जवळच्या व्यक्तीसाठी किरण मानेंची पोस्ट

'पहिल्यांदा तिची किंमत मला कळली'; जवळच्या व्यक्तीसाठी किरण मानेंची पोस्ट

googlenewsNext

किरण माने (kiran mane)  हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी सध्याच्या घडीला नवीन नाही. अनेक गाजलेले चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून ते कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहिले. परंतु, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत आहेत. किरण माने सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून अलिकडेच त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांना कविता आणि किर्ती या दोन सख्ख्या बहिणी आहेत. यापैकी कविता वाढदिवस असल्यामुळे त्यांनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. सोबतच बालपणीच्या काही आठवणीदेखील जागवल्या आहेत. विशेष म्हणजे शाळेत असताना बहीण आपल्या चुगल्या कशा आईला सांगायची हेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

"आई, आज भाऊनं शाळेत मारामारी केली." मी घरी पोहोचायच्या आत 'चहाडी' करून झालेली असायची... घरी आल्यावर आई शांतपणे विचारायची 'शर्ट का खराब झालाय?' मी थाप मारायचो, 'खेळताना पडलो'.. एका सेकंदाच्या आत खाडकन मुस्काडात बसायची. "मला सगळं कळलंय." मग खरडपट्टी. कुणी लावालावी केली असणार हे लग्गेच लक्षात यायचं माझ्या. मी रागात माझी बहीण कविताकडं पहायचो. मग खुन्नस...आमच्यात दोन वर्षांचं अंतर. लै लै लै भांडलोय आम्ही.  खरंतर तिचा लै जीव माझ्यावर. पण मला ते उशीरा कळलं. कविता आणि किर्ती..दोघी बहिणींत एकुलता एक भाऊ मी. कविताचं लग्न लागलं आणि ती सासरी जायला निघाली त्याक्षणी पहिल्यांदा तिची किंमत मला कळली ! आतून खूप काहीतरी तुटल्यासारखं झालं.. माझं काहीतरी हक्काचं-जवळचं माझ्यापासून दूर जातंय या भावनेनं अक्षरश: हादरलो-कळवळलो... तिथुन पुढं कधीच भांडलो नाही तिच्याशी...",असं किरण माने म्हणाले.


 

पुढे ते म्हणतात," माझ्या प्रत्येक चढउतारांत कविता माझ्यासोबत असणार  हे मी कायम गृहित धरल्यासारखंय. ती कुठेही असो, माझ्याकडे तिचं बारीक लक्ष असतं. शाळेतल्यासारखंच ! फेसबुकवर मी काय पोस्ट करतो, कुठे काय कमेन्ट करतो, कुणाशी वादविवाद करतो... सगळ्या चहाड्या अजूनही केल्या जातात. फक्त हल्ली माणूस बदललंय. आईऐवजी वहिनीकडं चुगल्या असतात ! पण आता मी खुन्नस धरत नाही. कारण यामागचा गोडवा मला जाणवलाय..माया कळलीये ! कविता नाटका-सिनेमाची उत्तम जाणकार.. परखड समीक्षक. याचा मला अभिनयप्रवासात खूप फायदा झाला..आणि होतोय. माझं प्रत्येक नाटक-प्रत्येक सिनेमा-प्रत्येक सीन-प्रत्येक एपिसोड, त्यातला माझा अभिनय अत्यंत बारकाईनं पाहून त्यावर सखोल चर्चा करते ती. स्पष्ट मतं मांडते.  कविता, तू महाडवरून सातारला आलीयेस. मी ही आत्ता मुंबैवरून सातारला यायला निघालोय. संध्याकाळपर्यन्त पोचेन. पण आज माझ्यासाठी मटण-मासे काही करत बसू नकोस. मस्तपैकी बाहेर जाऊ जेवायला. सेलीब्रेट करू. वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा कविता ! - भाऊ.

दरम्यान, अभिनेत्यामध्ये दडलेल्या या भावाची म्हणजे किरण मानेंची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेत येत आहे. अनेकांनी या बहीण-भावांच्या नात्यावर सुंदर कमेंट केल्या आहेत.
बहिणीच्या वाढदिवशी किरण मानेंनी शेवटी बहिणीला घरी काही मटण मासे करत बसू नको. मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊ आणि सेलिब्रेट करु असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
 

Web Title: marathi actor kiran mane shared childhood memory with sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.