"सेक्सकडे दोन-चार मिनिटांचा खेळ म्हणून बघणार्या पुरुषांच्या जगात...", भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग'बद्दल किरण मानेंची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:50 PM2023-10-17T14:50:42+5:302023-10-17T14:55:02+5:30
"'ऑरगॅजम'पर्यंत पोचवणारा पुरूषच नवरा म्हणून पाहिजे...", भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग'साठी किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
किरण माने हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे माने चर्चेत आले होते. तर 'बिग बॉस मराठी'मुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनयाबरोबरच माने त्यांचे परखड व्यक्तिमत्त्व आणि स्वभावासाठी ओळखले जातात. समाजातील अनेक घडामोडींवर ते स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात.
मानेंच्या सोशल मीडिया पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. आवडत्या गोष्टींचं कौतुक करणारे माने खटकणाऱ्या गोष्टींबद्दलही तितकंच परखडपणे मत व्यक्त करतात. सध्या मानेंच्या अशाच एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. किरण मानेंना भूमी पेडणेकरच्या 'थँक्यू फॉर कमिंग' या चित्रपटाबाबत एक पोस्ट लिहिली आहे.
किरण मानेंची पोस्ट
मागच्या आठवड्यात एका सिनेमाचं कौतुक करताना एका जाणकार समीक्षकानं लिहिलं होतं, 'क्लायमॅक्स फसलाय, पण सिनेमा छान आहे !'...वाचून म्हटलं, च्यायला हे कसं शक्य आहे? 'क्लायमॅक्स' फसणारी कुठलीबी गोष्ट चांगली कशी असू शकते??? उत्तम क्लायमॅक्ससाठी तर आयुष्यात सगळा झगडा सुरू असतो आपला...असो.
तर अशा एका अति महत्त्वाच्या 'क्लायमॅक्स'बद्दल बिनधास्त बोलणारा भन्नाट पिच्चर परवा बघितला...'थॅंक यू फॉर कमिंग'! सेक्समध्ये स्त्रियांना हव्या असणार्या 'ऑरगॅजम'बद्दल मनोरंजनातनं काहीतरी सांगू पहाणारा असा भारतीय 'मेन स्ट्रीम' सिनेमा आजपर्यंत मी तरी पाहिला नव्हता.
पाचसहा वर्षांपूर्वी कंडोम बनवणाऱ्या एका कंपनीनं रिसर्चनुसार सांगीतलं होतं की आपल्याकडं सत्तर टक्के महिलांना सेक्स दरम्यान ऑरगॅजम मिळतच नाही आणि नव्वद टक्के पुरूष सेक्सदरम्यान स्त्रियांना काय हवंय याचा विचारच करत नाहीत !! खरंतर याच आपल्या भारत देशानं हजारो वर्षांपूर्वी वात्स्यायन नावाचा खराखुरा फेमिनिस्ट विचारवंत दिला. ज्यानं 'कामसूत्र' ग्रंथात लिहिलंय की 'सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व आहे. उत्तम सेक्स तोच असतो ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र तृप्तीच्या चरमसीमेपर्यंत अर्थात क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात.'
या विषयी 'जाणीव' झालेल्या आजच्या काळातल्या एका तरूणीची गमतीशीर कथा 'थॅंक यू फॉर कमिंग'मध्ये सांगितली आहे. 'ऑरगॅजम'पर्यंत पोचवणारा पुरूषच नवरा म्हणून पाहिजे ही तिची इच्छा. सेक्सकडे केवळ दोन चार मिनिटांचा खेळ म्हणून बघणार्या पुरुषांच्या जगात तिचा हा प्रवास खूप अनपेक्षित धक्के देत, वळणं घेत, अतिशय इन्टेन्स अशा शेवटाकडे, तिला हव्या असलेल्या क्लायमॅक्सकडे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणार्या 'चरमसीमे'कडे घेऊन जातो! सिनेमात काही लॉजिकल चुका आहेत. उथळ वाटेल असा फेमिनिजम आहे. पण एक मात्र खरं की, स्त्रियांविषयी जी गोष्ट उघडपणे बोलली जात नाही, चारभिंतीतही विषय नसतो. तिला ग्लॅमरस कमर्शियल सेक्स कॉमेडी सिनेमाच्या माध्यमातनं का होईना वाचा फोडली गेली.
असा सिनेमा लिहिल्याबद्दल राधिका आनंद -प्रशस्ती सिंग या लेखिकांच्या जोडीला सलाम केला पाहिजे. पुरूषांसाठी स्त्रिचा 'जी पॉईंट' शोधणं जितकं कठीण, तितकंच स्त्रिसाठी त्या गोष्टीचं महत्त्व एक्सप्लेन करणं अवघड...ते काम या दोघींनी अतिशय सहजपणे केलंय. एका हटके विषयाची छान रोलर कोस्टर राईड हवी असेल तर नक्की बघा...'थॅंक यू फॉर कमिंग' !
किरण मानेंनी 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाबद्दल केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. माने सध्या कलर्स मराठीवरील 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.