"हा काय स्वत:ला बच्चन समजतो", बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, "मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:41 PM2023-10-11T13:41:41+5:302023-10-11T14:12:42+5:30

Amitabh Bachchan Birthday : "शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा गप्प बसणारा...", बिग बींसाठी किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत

marathi actor kiran mane shared special post for big b amitabh bachchan on his birthday | "हा काय स्वत:ला बच्चन समजतो", बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, "मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा..."

"हा काय स्वत:ला बच्चन समजतो", बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, "मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचले. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते पोस्टमधून व्यक्त होताना दिसतात. किरण माने अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेक गोष्टींबद्दल ते अगदी परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात. आज बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

किरण मानेंनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सविस्तर पोस्ट लिहिली आहे. फेसबुकवर मानेंनी अमिताभ बच्चन यांचा एक मीम शेअर केला आहे. "नमस्कार मी मुंबईचा किरण माने" असं बिग बींच्या फोटोवर लिहिलं आहे. बिग बींचा जबरा फॅन असलेल्या मानेंनी त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

बिग बींसाठी किरण मानेंची पोस्ट

.... या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबाॅसमध्ये 'सातारचा बच्चन' हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती... पन तरीबी 'मराठी मीम माॅंक्स'वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलं व्हतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.

 

"किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो." लहानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हणणाऱ्यानं ते चिडून म्हणलेलं असायचं, पण मनातल्या मनात मी लै खुश व्हायचो! लहानपनी 'बच्चन' हे माझं 'जग' होतं...मायनीच्या  'गरवारे टुरींग टाॅकीज'च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापासनं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघत रहानं हा आवडता छंद होता...रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो...मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची...बच्चनचं चालनं - बोलनं - बघनं - उभं रहानं - बसनं - पळनं - फायटिंग करणं सगळं-सगळं माझ्यात भिनलं व्हतं लहानपणी.

...त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढणारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेणारा 'ॲंग्री यंग मॅन' मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूणपनी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुनावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हणायला लागले, "हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?"... ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !

...पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत ! तोच 'ॲंग्री यंग मॅन' वैयक्तीक आयुष्यात व्यवस्थेला शरण जानारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवनारा हा 'शहेनशाह' बघून वाईट वाटायला लागलं... पुर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी 'चुप्पी साधलेला' बघून आश्चर्य वाटायला लागलं... कुनाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करन्याची पोस्ट करणारा... ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसणारा... केविलवाणा बच्चन बघून कीव यायला लागली..

...पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो 'बच्चन' आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला 'बच्चन' हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की...जिवंत - रसरशीत - खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम... ❤

किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सध्या माने 'सिंधुताई माझी माय' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी अनेक नाटक आणि गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: marathi actor kiran mane shared special post for big b amitabh bachchan on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.