Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:36 AM2022-06-30T11:36:30+5:302022-06-30T12:00:22+5:30

Maharashtra Political Crisis, Uddhav Thackeray, Kiran Mane : किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धवजी, एकच शब्द- ग्रेसफुल! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

marathi actor Kiran Mane's post for Uddhav Thackeray shiv sena | Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट

Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट

googlenewsNext

Uddhav Thackeray, Kiran Mane : राज्यातील गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं पण जाता जाता उद्धव ठाकरे यांच्या संयमी भाषणानं सर्वांची मनं जिंकलीत. पक्षातील निष्ठावंत सोडून गेलेत आणि उद्धव यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. आपल्या अखेरच्या भाषणात याबद्दलची खंत त्यांनी बोलून दाखवली. पण हे करत असताना त्यांनी संयमाचं दर्शन घडवलं. उद्वेग, चिडचिड  करता अगदी शांतपणे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं जाहिर केलं. त्यांच्या या भूमिकेचं, त्यांच्या संयमीपणाचं अनेकजण कौतुक करत आहेत. कलाकार मंडळींनीही सोशल मीडियावर पोस्ट करत, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) त्यापैकीचं एक.  (Maharashtra Political Crisis)

किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धवजी, एकच शब्द- ग्रेसफुल! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर साताऱ्याजवळच्या खिंडवाडी गावातील एका घरची सत्यघटनाही सांगितली आहे.

किरण माने लिहितात...,

...उद्धवजी, एकच शब्द : 'ग्रेसफुल' !

सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लै छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. गांवाकडची साधी मान्सं. राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काडीचाबी संबंध नाय. पोटापुरतं कमावणे आणि हातातोंडाशी गाठ घालणे यापलीकडं दुनियादारीशी संबंध नाय. लै दिसातनं जमीनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो, आन् 'ती' बातमी दिसली...

...कुनाचा विश्वास बसनार नाय, पन तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजनांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या तरन्या लोकांपास्नं म्हातार्‍यांपर्यन्त प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं 'चांगला मानूस व्हता' !

उद्धवजी, खरं सांगू? मला लै आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पन तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नविन नाय. राजकारनात तर 'काॅमन' गोष्ट हाय. खर्‍या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत... सामान्य मानूस असो वा सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर पराभवाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. विश्वासघाताचं दु:खबी सगळ्यांना पचवावं लागतं. पन अशावेळी लै कमी लोक तुमच्यासारखे 'धीरोदात्त' असतात ! मी म्हनत नाय की तुमची चूक नसंलच. तुमच्याकडुन चुका झाल्याबी असतील. पन तरीबी जे घडलं ते 'मानूस' म्हनून उद्ध्वस्त करनारं होतं. तुम्ही आतनं 'तुटला' नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का?? जी मान्सं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आनली.. त्या मान्सांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का???

कुनी म्हनंल, 'ही राजकारनी लोकं लै पोचलेली असत्यात. सगळे सारखेच.' हे बी मान्य. तुमी लोक धुतल्या तांदळासारखे नसता. तरीबी मी फक्त 'मानूस' म्हनून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीबी ज्या संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता, तारस्वरात न किंचाळता, शांतपने पद सोडलंत, ती वृत्ती 'आजकाल' लै दूरापास्त झालीय.

मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय... कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात ! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीनारा मी ना शिवसैनिक, ना राजकारनी. तुमी आयुष्यात कुठली मदतबी मला केलेली नाय आनि मी ती अपेक्षा बी कधी ठेवली नाय. तरीबी मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची 'ॲचिव्हमेन्ट' आहे !

लब्यू उद्धवजी. 

- किरण माने.

Web Title: marathi actor Kiran Mane's post for Uddhav Thackeray shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.