"माणसं वेळ आली की रंग दाखवतात...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला-"असल्या अनुभवांनी..."
By सुजित शिर्के | Updated: March 12, 2025 08:49 IST2025-03-12T08:47:37+5:302025-03-12T08:49:12+5:30
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहोचला.

"माणसं वेळ आली की रंग दाखवतात...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला-"असल्या अनुभवांनी..."
Kushal Badrike: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहोचला. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याचा एक वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दरम्यान, कुशल बद्रिके त्याच्या अभिनयासह सोशल मीडियावर कायम त्याच्या पोस्टमुळे चर्चेत येत असतो. कुशल त्याच्या कामाव्यतिरिक्त सोशल मीडियावर त्याच्या कुटंबीयांचे तसेच मित्र-मंडळींचे अनेक मजेशीर व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. होळीच्या निमित्ताने अशीच एक मजेशीर पोस्ट अभिनेत्याने लिहून सोशल मीडियावर शेअर केली आहे. कुशलच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कुशलने नुकतेच त्याच्या इन्स्टग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यापोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "आयुष्यात आलेली काही माणसं, त्यांची वेळ आली की आप-आपले रंग दाखवतात आणि निघून जातात, असल्या अनुभवांनी आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडतो पण या दोन्ही प्रकारच्या रंगानी होळी (धुळवड) खेळता येत नाही, आणि ज्या रंगानी ती खेळता येते त्यातले बरेचसे रंग कोणत्या ना कोणत्या तरी समाजाने वाटून घेतलेत नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाने वाटून घेतलेत."
पुढे कुशलने म्हटलंय, "या होळीत जर चुकून माझ्याकडून असा एखादा रंग उधळला गेलाच तर तो “होळीचाच” होता, हे मी आत्ताच जाहीर करतो. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू माझ्या “अंत-रंगात” नाही. या दिवशी पाण्याने होळी खेळणाऱ्याची तर बिनपाण्याने केली जाते… ", असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. कुशलची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहिलं आहे,"आपण फक्त पाण्या सारखे राहायचं", तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, "हा कुशल नामक अवलिया शब्दरंग उधळण्याच कौशल्य दाखवतो त्याक्षणीच आम्ही प्रेमरंगात रंगतो...".