"जीव गुदमरत होता...", शिवशाही बसमधून प्रवास करताना मराठी अभिनेत्याला आला वाईट अनुभव, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:01 IST2025-03-11T08:59:38+5:302025-03-11T09:01:46+5:30
सोशल मीडिया हे हल्लीच्या काळातील एक प्रभावी साधन आहे.

"जीव गुदमरत होता...", शिवशाही बसमधून प्रवास करताना मराठी अभिनेत्याला आला वाईट अनुभव, म्हणाला...
Ruturaj Phadke : सोशल मीडिया हे हल्लीच्या काळातील एक प्रभावी साधन आहे. सोशल मीडियाचं जाळं हे शहरापासून गावगाड्यांपर्यंत विस्तारलेलं आहे. जगाच्या पाठीवर कुठं काय घडतंय याची माहिती यावर सहज मिळून जाते. हे माध्यम जणू प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलेब्रिटी मंडळी सुद्धा प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील महत्वाचे अपडेट्स ते यामार्फत शेअर करतात. अशातच अलिकडेच एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने शिवशाही बसने प्रवास करताना त्याला आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे. हा अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके आहे.
'मन उडू उडू झालं' तसेच 'मुरांबा' या मालिकांच्या माध्यमातून ऋतुराज फडके हा महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाला. त्याने साकारलेल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अगदी अलिकडेच अभिनेत्याने शिवशाही बसने प्रवास करताना त्याला आलेले अनुभव सांगितले आहेत. फेसबुक मोजक्या शब्दांत आपलं मत त्याने मांडलं आहे. दरम्यान, ऋतुराज फडकेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आजचा दापोली-ठाणे, शिवशाही बस मधला अनुभव..., बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं. एक ७० km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता. Ac मुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या, ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली. ड्रायव्हरने उत्तर दिलं ac असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बस स्टॉप वर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बसमध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच ती बंद पडली. कशी बशी ती स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं, मी पनवेल मध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो, आणि आलो सुद्धा. बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणा डेपोत पोहोचते, आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉप वर चढलात ना? दापोली ठाणे बस मध्ये होतात ना?? मी म्हटलं हो. डेपोतून समोरच्या व्यक्ती म्हणाला मग बस कुठे आहे बस अजून पर्यंत ठाणा डेपोत आलेली नाहीये. ही दुरावस्था शिवशाही बसची." अशी पोस्ट शेअर करुन अभिनेत्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.