Ashadhi Ekadashi 2022: 'मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'; मिलिंद गवळींना वारीत आला अद्भूत अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:45 PM2022-07-04T14:45:38+5:302022-07-04T14:46:11+5:30
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी वारीत सहभागी झाल्यानंतर भाविक, प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला हे सांगितलं.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरात दाखल होतात. यावर्षी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून, अनेक भाविक पंढरपुराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आतापर्यंत सामान्यांसोबतच काही सेलिब्रिटींनीही या वारीत सहभाग घेतला. तर काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीतील अनुभव सांगितला. यामध्येच 'आई कुठे काय करते'फेम अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी त्यांचा वारीतील अनुभव सांगितला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या चित्रपटातील एक सीन व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसंच चित्रपटाच्या निमित्ताने वारीत सहभागी झाल्यानंतर भाविक, प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला हेदेखील सांगितलं.
"आषाढी एकादशी आता जवळ येत आहे. जवळजवळ 21 वर्षापूर्वी "विठ्ठल विठ्ठल" सिनेमाच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर माझी वारी झाली होती. एक विलक्षण वेगळा अनुभव माझ्या गाठीशी बांधून मी माझ्या आयुष्याचा प्रवास करतो आहे. पांडुरंगाच्या वारीला जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे, ज्यांनी कोणी वारी केली आहे त्यांनाच तो माहितीये, ज्यांच्या आयुष्यामध्ये वारी घडली नाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोलाचा राहून गेलेलं आहे ! काही दिवसापासून पांडुरंगाच्या वारीच्या वारकऱ्यांच्या बातम्या कानावर पडत आहे. छान पाऊस सुरू झाला आहे, “विठ्ठल विठ्ठल “सिनेमा मेकिंगच व्हिडीओ फुटेज मला मिळालं, सहा सात जुलै 2003 , आळंदी पासून शूटिंग करत करत पंढरपूर पर्यंत आम्ही चाललो होतो, अहिरे लिखित आणि दिग्दर्शित रिफ्लेक्शन निर्मित वृंदा अहिरे, मिताली जगताप, श्वेता लंडनचे प्यारी शिवपुरी आणि अलकाताई कुबल, प्रसाद ओक व शरद पोंक्षे पाहुणे कलाकार. सगळ्यांसाठीच हा सिनेमा वेगळा अनुभव देऊन गेला .शासनाचे 2 बक्षीस, @everestentertainment एवरेस्ट कडे येथे राइट्स आहेत", असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आता गेली अडीच तीन वर्ष आई कुठे काय करते “ मधल्या अनिरुद्ध देशमुख माझ्या या भूमिकेला बायकांनी असंच शिव्या दिल्या आणि देत आहेत, अजूनही देतायेत. अशावेळेला “विठ्ठल विठ्ठल “या सिनेमातल्या भूमिकेचा अनुभव खूप आवर्जून आठवतो. तो अनुभव असा आहे. मी एक साधू संन्याशाच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो. शूटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता आणि तीन चार बायका माझ्यासमोर येऊन बसल्या, एका वयस्कर बाईन माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि, मला म्हणाली “बाबा माझ्या आयुष्याच सार्थक झालेला आहे , दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. मुलगा रांकेला लागलेला आहे, आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या ,म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन “,मी त्या बाईंना म्हणालो “आजी जा त्या विठ्ठलाच्या पाया पड माझ्या नको, मी एक कलाकारे आणि हा साधू चा रोल करतोय “त्या बाई म्हणाल्या “नाही बाळा ,तूच मला आशीर्वाद दे ,कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्या मध्ये “ कलाकारच आयुष्य किती वेगळ आणि सुंदर आहे बघा ,एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि “विठ्ठल विठ्ठल “या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो ,पांडुरंग दिसतो . विलक्षण नाही का हे सगळं ! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!"
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. एका महिलेने मिलिंद यांना विठ्ठल मानून त्यांचे पाय धरले ही गोष्ट अभिनेत्यासाठी अत्यंत थक्क करणारी होती. परंतु, या वारकरी महिलेच्या कृतीवरुन तिची विठ्ठलावर किती श्रद्धा होती हे स्पष्टपणे जाणवत होतं.