"सामान्य माणसांनी काय करायचं?", हक्काच्या घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 11:34 IST2025-03-29T11:30:26+5:302025-03-29T11:34:49+5:30
"कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं, पण…" हक्काच्या घरासाठी मराठी अभिनेत्याला करावी लागतेय वणवण, प्रशासनावर साधला निशाणा

"सामान्य माणसांनी काय करायचं?", हक्काच्या घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण
Shashank Ketkar: मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. शशांकने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. वेगवेगळे मराठी चित्रपट, नाटकं तसेच मालिकांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'होणार सून मी या घरची' मधला श्री असो किंवा आता 'मुराबां'मधील अक्षय मुकादम असो अभिनेत्याने त्याच्या अभिनयाने या भूमिकांना योग्य न्याय दिला.दरम्यान, शशांक केतकर त्याच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळेसुद्धा अनेकदा चर्चेत येतो. बऱ्याचदा नेहमीच समाजात आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितींवर तो भाष्य करत असतो. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
शशांक केतकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे अभिनेत्याने म्हटलंय, "यार काय करू? मीरा रोडला बारा वर्षांपूर्वी मी एक घर घेतलं आहे. ते अजून मला मिळालेलं नाही. कारण त्यावर गव्हर्नमेंन्टचा सील आहे. कुणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू म्हणजे एकतर ती बिल्डिंग पाडली जाईल किंवा मला परत कुणीतरी बांधून देईल. काय करु? बॅंकेकडून ऑफिशिअल लोन घेतलं होतं, पैसे भरून झाले आहेत. पण, घर काही मिळालं नाही. आणि फक्त मुंबईतच काय, महाराष्ट्रातच काय, भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहेत जे उभे राहताना काहीतरी तिथे अवैध घडतंय, हे तिथल्या प्रशासनाला समजायला हवं."
याच व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलंय, "सामान्य माणसांनी काय करायचं??? कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहीलं… १२ वर्ष झाली, घर book करून.. loan सुध्दा फेडून झालं, पण घरचा ताबा मिळण्याची शक्यताही अजून दिसत नाहीये. सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. दर तारखेला..पुढची तारीख मिळते. पण तिथेही निकाल लागत नाही. झाडून सगळ्या politicians कडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात? आम्हा सामान्य जनतेला हे secret सांगा ना! सांगा कसं जगायचं… ( आनंदानी, अभिमानानी आणि समाधानानी)." असं लिहित शशांक केतकरने संताप व्यक्त केला आहे.
वर्कफ्रंट
शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या अभिनेता 'मुरांबा' मालिकेत पाहायला मिळतोय. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला','नकटीच्या लग्नाला यायचं हं', तसंच 'शो टाइम',' गुनाह' अशा विविध टीव्ही मालिका व वेब सीरिजमध्ये अभिनेता झळकला आहेत.