Exclusive: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय हिंदी सीरिजमध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता
By ऋचा वझे | Updated: February 23, 2025 13:13 IST2025-02-23T13:13:02+5:302025-02-23T13:13:46+5:30
Exclusive: "हिंदीत अनेक कामं करुनही..." अभिनेत्याने मांडलं स्पष्ट मत, वाचा सविस्तर मुलाखत

Exclusive: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय हिंदी सीरिजमध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता
२००१ साली आलेली 'चार दिवस सासूचे' मालिका आठवतेय? अनेकांना आपलं बालपणच आठवलं असेल. ही त्याकाळातली सर्वात सुपरहिट आणि सुमारे १३ वर्ष चाललेली मालिका आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता पंकज विष्णू (Pankaj Vishnu) सध्या एका हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसंच काही वर्षांपासून तो हिंदीतच सक्रीय आहे याचं कारणही त्याने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. वाचा अभिनेता पंकज विष्णूशी साधलेला हा Exclusive संवाद
सध्या तू हॉटस्टारवरील 'पॉवर ऑफ पांच' या सीरिजमध्ये दिसत आहे. या सीरिजबद्दल काय सांगशील?
होय, मी पहिल्यांदाच sci-fi सीरिजमध्ये काम करत आहे. याचे आतापर्यंत २४ एपिसोड्स टेलिकास्ट झालेत. आधी याचं नाव 'पॉवर ऑफ पंच' होतं नंतर ते 'पॉवर ऑफ पांच' असं झालं. युनिव्हर्समधील पाच एलिमेंट्सवर ही गोष्ट आधारित आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि पाचवा एलिमेंट हा गुलदस्त्यात आहे. प्रत्येकाकडे एकेक एलिमेंटची शक्ती आहे आणि ही शक्ती पिढ्यान् पिढ्या पुढे जात असते. हा हायस्कुल ड्रामा आहे आणि पाच मुलांची गोष्ट आहे. आम्ही सगळेच मुळात एलिमेंट्स आहोत. मी जल म्हणजेच वॉटर एलिमेंट आहे. आमची मुलं १६ वर्षांची झाल्यावर त्यांच्याकडे आमच्या शक्ती ट्रान्सफर झाल्या आहेत. यामध्ये स्पेशल इफेक्ट्स आहेत. प्रत्येकाच्या मानवी भावना यात सुरेख कॅप्चर केल्या आहेत. तसंच जसं सकारात्मक शक्ती असते तशीच नकारात्मकही असते. त्यामुळे यामध्ये एव्हिल फोर्सेस आहेत ज्यांच्याशी या मुलांचा लढा असतो. ते कसे जगाला या एव्हिल फोर्सेसपासून वाचवतात याची ती गोड गोष्ट आहे.५० एपिसोड्सची ही सीरिज आहे. प्रत्येक शुक्रवारी ४ एपिसोड्स रिलीज होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय याचा आनंद आहे.
सीरिजमध्ये तुझी नक्की काय भूमिका आहे?
मी कार्तिक या मुख्य भूमिकेत आहे. मी एकटा असा असतो ज्याचा या सगळ्या शक्तींवर विश्वास असतो. कारण मी शास्त्रज्ञही आहे. माझे सगळे मित्र आधी मला वेड्यात काढतात. तसंच शास्त्रज्ञ विक्षिप्त असतात तसा मी त्यांना वाटतो. पणनंतर त्यांनाही या शक्तींची जाणीव होते तेव्हा सगळे भानावर येतात. यात मला एक मुलगी आहे बियांका. ती सुद्धा वॉटर एलिमंट आहे.
या भूमिकेसाठी निवड कशी झाली आणि काही विशेष तयारी करावी लागली का?
आपण हॉलिवूडच्या प्रसिद्ध असलेल्या मार्व्हल सीरिज पाहिलेल्या आहेतच. हे पाहताना निरीक्षण करणं खूप महत्वाचं असतं. लहानपणापासून मी सुपरमॅन पाहिलंय. त्यामुळे ते संस्कार आपल्यात येतात. हे सायफाय विश्वही काल्पनिक आहे. त्याला आपण वास्तवाची जोड कशी देतो. वाईटावर चांगल्याचा विजय होतो हेच सुपरहिरो फिल्ममध्ये दाखवलं जातं. त्याचंच निरीक्षण करुन मला कार्तिकची भूमिका साकारता आली. तसंच मी यासाठी ऑडिशन दिली होती. ऑडिशनमध्येच मेकर्सला कळलं होतं की मला ही भूमिका खरोखरंच समजली आहे. त्यांनी आधी अनेक ऑडिशन्स घेतल्या होत्या. पण त्यांना तसं कॅरेक्टर मिळत नव्हतं. माझ्या परफॉर्मन्समध्ये त्यांना दिसलं की जी भूमिका आहे त्याचा खरा अर्थ हा मलाच समजला आहे. अशा प्रकारे मग माझी निवड झाली.
सीरिजमध्ये अभिनेत्री उर्वशी ढोलकिया देखील आहे. ती सुद्धा टेलिव्हिजनमधली जुनी अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याता अनुभव कसा होता?
उर्वशी आणि माझ्यात एक समान धागा होता तो म्हणजे बालाजी टेलिफिल्म्स. तिने बालाजीच्या निर्मितीखाली मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच मीही बालाजीची सर्वात गाजलेली मालिका 'पवित्र रिश्ता' केली होती. त्यामुळे आमची लगेच मैत्री झाली. तसंच ती मुंबईची मुलगी आहे आणि मीही मुंबईचाच आहे. ती अगदी बिंधास्त, मोकळ्या स्वभावाची आहे. सर्वांच्या मदतीला धावून जाणारी आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना मला आली. तसंच सीरिजमध्ये इतरही बरखा, यश, रिवा अरोरा हेही आहेत ज्यांच्यासोबत काम करायला मिळालं. यश, रिवा, जयवीर, बियांका ही तरुण मंडळी आहेत ज्यांच्यासोबतही काम करताना धमाल आली.
सध्या अनेक हिंदी प्रोजेक्ट्समधूनच तू भेटीला येतोय. मराठीमध्ये पुन्हा कधी दिसणार?
(हसतच) मलाही तेच वाटलं. पण खरं सांगायचं तर मला इंटरेस्टिंग रोल ऑफरच झाला नाही. मी 'हृदयी प्रीत जागते' ही शेवटची मराठी मालिका केली. मालिकेची संकल्पना खूपच चांगली होती. संगीतावर आधारित होती. मनोहर ही माझी भूमिका होती. पण काही कारणामुळे ती लवकर संपली. त्यानंतर मला चांगलं काही ऑफरच झालं नाही. पण मी मराठी चित्रपट मध्ये मध्ये करत राहतो. तो टच सोडलेला नाही. आताच 'घडाघडा बोला' सिनेमा केलाय. मागच्या वर्षी 'छापा काटा'मध्ये मकरंद अनासपुरेंसोबत काम केलं. पण मालिका म्हणाल तर मलाही आश्चर्य वाटतं की एकेकाळी मी लाँग रनिंग मालिका केल्या होत्या. चार दिवस सासूचे, अवघाची संसार, समांतर, दामिनी अनेक वर्ष चालल्या. पण आता असं झालंय की नवीन कलाकार आलेत. मेकर्सला आता फ्रेश चेहरे हवे असतात. मध्यमवयीन अभिनेता असलेलेल खूप कमी कथानक असतात. त्यामुळे ऑफर्स कमी झाल्या आहेत. पण तरीही मला मराठी मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल. मीही वाटच बघतो आहे.
हिंदीत काम करताना मराठी कलाकारांना अगदीच मोजके सीन असतात. याबद्दल काय वाटतं?
हो असं होतं. पण ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मी नेटफ्लिक्सवर 'स्कूप' सीरिजमध्येही काम केलं होतं. माझा फार मोठा रोल नव्हता कारण त्यात भरपूर कॅरेक्टर्स होते. त्यामुळे सीन एक जरी असला तरी तो किती महत्वाचा आहे, त्यात किती ताकद आहे, काही पंच आहे का तरच मी तो करतो. आला आणि गेला अशी भूमिका असेल तर त्यात काही पॉइंट नाही. उदाहरणार्थ, ॲनिमलमध्ये उपेंद्र लिमयेचा एकच सीन आहे पण त्याने तो वाजवलाय. मराठीमध्ये सगळेच चांगले कलाकार आहेत कारण रंगभूमीवर काम केल्याने त्यांचं बाळकडू उत्तमच असतं. हिंदीत आपल्या कलाकारांना आदर असतो. तसंच अनेकदा काही गोष्टींवर अवलंबून असल्याने आपण काम करतो. जसं की कधी नट चांगला असतो, कधी दिग्दर्शक चांगला असतो ज्यांच्याबरोबर काम करायची इच्छा असते हे पाहून मग तो प्रोजेक्ट केला जातो. पण हा, उगीच छोटा रोल करणं हे चुकीचं आहे ते करु नये. त्याचा करिअरमध्येही काही उपयोग होत नाही.