जुई गडकरी झाली होती अकरावीत नापास, जाणून घ्या किती पडले होते मार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:16 AM2024-02-05T11:16:38+5:302024-02-05T11:18:22+5:30
जुई अकरावीत असताना नापास झाली होती.
मराठी मालिकाविश्वात तुफान नेम आणि फेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणामुळे जुईने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का जुई अकरावीत असताना नापास झाली होती. याविषयी तिनं नेमका एक किस्सा सांगितला आहे.
जुई गडकरीनं नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या व्यावसायिक आणि खासगी जीवनावर भाष्य केलं. ती म्हणाली, "माझे शाळेचे दिवस फार वाईट होते. मला कधीच अभ्यास करायला आवडायचं नाही. दहावीत सुद्धा फक्त ५८.८० टक्के गुण मिळाले. इतके कमी मार्क पाहून मी खूप रडले होते. तेव्हा मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती. याचं कारण म्हणजे माझं प्राण्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मला व्हेटर्नरी सर्जन व्हायचं होतं. पण, ५८ टक्क्याला सायन्ससाठी मला कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. शेवटी माझ्या आईने कॉमर्स केलं होतं. म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घे असं सांगितलं'.
पुढे जुई म्हणाली, 'सीएचएम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कोट्यामधून प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक विभागात सहभाग घेतला होता. कॉलेज सुरू झाल्यावर पुढे वर्षभर माझे गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. मी वर्गात तासिकांना अजिबात बसायचे नाही. शेवटी माझ्या मराठीच्या मॅडमने मला बोलावणं पाठवलं आणि मी त्यांना सांगितलं की मला वर्गात बसायला नाही आवडत. त्यानंतर मग अकरावीत असताना मला ६७ टक्के मिळाले. पण गणित विषय राहिल्याने मी नापास झाले. मला गणितात १०३ पैकी मला फक्त ३ गुण मिळाले होते'.
पुढे ती म्हणाली, 'इतकी हुशार मुलगी नापास झाली असं वातावरण माझ्या घरी झालं. माझी तर घरी जायची हिंमतच होत नव्हती. मग आमचे सर मला घरी घेऊन गेले. तेव्हा माझ्या एका सरांनी आई-बाबांची समजूत काढली. जुई बाहेरून बारावी पूर्ण करेल असं आश्वासन माझ्या घरी दिलं. मग मी अभ्यास करून अगदी छान पास झाले बारावी. त्यानंतर विद्यापिठात बीएमएम (BMM) हा आवडीचा विषय घेतला आणि विद्यापिठातून पहिली आले. मी खूप हट्टी आहे याबाबतीत. आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर मी चांगलं करु शकते. त्यानंतर मग मी पदवीनंतर पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली, एमबीए केलं'.