संकर्षण कऱ्हाडेचं परभणीत सनई-चौघड्यांनी स्वागत; गावकऱ्यांचं प्रेम पाहून भारावला अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:32 PM2024-01-10T12:32:47+5:302024-01-10T12:36:59+5:30
संकर्षण हा परभणीचा आहे.
मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो. संकर्षणनं अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. संकर्षण हा मुंबईकर झाला असला तरी त्याचं त्याच्या गावावरचं प्रेम कायम दिसून येतं. आपल्या गावाकडच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतो. पण, आता गावकऱ्यांचं संकर्षणवर असलेल्या अनोख्या प्रेमाचा प्रत्यय आला आहे.
नुकतेच ‘संकर्षण व्हाया स्पृहा' या नाटकाचा प्रयोग परभणीमध्ये झाला आणि परभणीकरांनी नाटकला हाऊसफूल प्रतिसाद दिला आहे. ऐवढचं नाही तर त्यांनी त्यांच्या लाडक्या संकर्षणचं अगदी सनई-चौघड्यांनी स्वागत केलं. गावकऱ्यांच हे प्रेम पाहून संकर्षणही भारावला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहलं, 'संकर्षणviaस्पृहा'चा कालचा परभणीचा प्रयोग HOUSEFUL… माझ्याच गावात माझ्या माणसांनी, प्रेक्षकांनी सनई चौघडे वाजवून स्वागत केलं….खूप कौतुक केलं…. THANK U परभणीकर'. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अभिनयात करिअर करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या आणि नाव कमावलेल्या कलाकारांपैकी संकर्षण हा एक आहे. पण त्याचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. संकर्षण हा मुळचा परभणीचा आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' हा संकर्षणचा डायलॉग फेमस आहे. 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आभास हा या मालिकेच्या माध्यमातून संकर्षणनं अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
संकर्षणनं 2012 मध्ये मला सासू हवी या मालिकेत काम केलं. 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'खुलता कळी खुलेना' या मालिकेत देखील संकर्षणनं काम केलं. माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेत संकर्षणनं साकारलेल्या समीर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर सध्या संपुर्ण महाराष्ट्रात त्याच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचे प्रयोग सुरू आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.