"प्रेक्षक तिकिटांसाठी कष्टाचे पैसे मोजून आणि ३ तास देऊन...", संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:54 IST2025-03-27T14:54:09+5:302025-03-27T14:54:30+5:30
आज जागतिक रंगभूमी दिन आहे. यानिमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे.

"प्रेक्षक तिकिटांसाठी कष्टाचे पैसे मोजून आणि ३ तास देऊन...", संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीचा लाडका नट आहे. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका अशा सगळ्यांच माध्यमांतून त्याने छाप पाडली आहे. यासोबतच तो उत्तम लेखकही आहे. संकर्षणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि तो चाहत्यांसोबत अपडेट्सही शेअर करत असतो. आज जागतिक रंगभूमी दिन आहे. यानिमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रेक्षक नाटकाच्या तिकिटांसाठी रांगेत उभं असल्याचं दिसत आहेत. हे फोटो शेअर करत संकर्षण म्हणतो, "२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पुण्यात आमच्या 'नियम व अटी लागू' नाटकाची तिकीट विक्री सुरू झाली होती. आज 'कुटुंब किर्रतन' नाटकाची सुरू झालीये...तस्साच दणक्यात प्रतिसाद...प्रेक्षकांच्या ह्या प्रतिसादामुळेच रंगभूमीवर सतत नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते आणि जबाबदारी वाढते".
पुढे तो म्हणतो, "प्रेक्षक त्यांच्या आयुष्यातले मोलाचे ३ तास आणि तिकिटांसाठी मोजलेले कष्टाचे पैसे देऊन येतात. त्यांच्या ह्या मोलाच्या प्रतिसादाची जाण कायम रहावी आणि हा प्रतिसाद वरचेवर वाढण्यासाठीची पात्रता कलाकार म्हणून अंगी यावी...जागतिक रंगभूमी दिनाच्या सगळ्या लेखकांना , कलाकारांना , तंत्रज्ञांना, बॅकस्टेज मंडळींना आणि प्रेक्षकांना खूप खूप खूप शुभेच्छा".