मराठी अभिनेत्याची २००० किमी सोलो बाईक राईड; बरेच जण म्हणाले, 'कलाकार आहेस जीवाला जप..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:12 AM2024-12-02T11:12:26+5:302024-12-02T11:13:23+5:30
सोशल मीडियावर त्याने या प्रवासात केलेल्या गंमतीजंमतीही दाखवल्या आहेत.
अनेक सेलिब्रिटींना बाईकचं वेड आहे. आपल्या लाडक्या बाईकवर दूरवर ड्राईव्हला जाणं तर त्यांच्यासाठी सुख असतं. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या बाईकवर तब्बल २१५० किलोमीटरचा प्रवास केला. मुंबई ते कर्नाटक असा हा प्रवास होता. दरम्यान त्याला अनेकांनी विचार कर, अभिनेता आहेस उगीच रिस्क घेऊन नको असाही सल्ला दिला. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संकेत कोर्लेकर (Sanket Korlekar) सोशल मीडियावर अनेक व्लॉग्स शेअर केले आहेत. बुलेटवर दोन राज्य पार करत त्याने २००० पेक्षा जास्त किमीचा प्रवास केला. यादरम्यान त्याला आलेल्या अनुभवांबद्दल तो लिहितो, "दोन राज्य पार करून २१५० किलोमीटरची सोलो बाईक राईड करून सुखरूप घरी पोहोचलो. बरेच जण म्हणाले की आत्ता जोशात जात आहेस येताना पण तेवढच ड्राइव करायचं आहे विसरू नको. येताना ट्रेनमध्ये गाडी टाकून आण. अभिनेता आहेस जीवाला जप उगीच परीक्षा घेऊ नकोस... का ? हे वय स्वतःची परीक्षा घेण्याचं नाही ? आत्ता हे सगळं नाही केलं तर कधी ? उद्या काय होईल कुणी बघितलंय ? मला आज जगायचंय बस.. उद्या एखाद्या प्रोजेक्ट मध्ये अडकलो तर मला आठवडाभर बाहेर सोडतील का किवा मी तरी असे धाडस करेन का ?
म्हणून मला आत्ता ते सगळं करायचंय जे सगळे करायला किवा त्यासाठी वेळ काढायला घाबरतात. माझा स्वतःवर विश्वास होता मी स्वतःला सुखरूप घरी परत आणले.. तुम्ही सुध्दा कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करू नका.. जेव्हा जे वाटेल ते करून टाका... आयुष्य खूप छोटं आहे. आणि हो.. बाईक राईड सेफ नाही म्हणणाऱ्या काही दगडांना सांगू इच्छितो की तोंडाला रुमाल गुंडाळून पायात चप्पल घालून साठ सत्तर हजाराच्या बाईकवरचा हा प्रवास नव्हता.. मला माझ्या जीवाची आणि स्वप्नांची प्रचंड काळजी आहे. माझ्या सोबत माझी perfect maintained classic signals होती, International Rider ने दिलेला रायडिंग सूट होता , प्रोफेशनल बूट ग्लोज आणि हेलमेट होतं.. ह्या राइडची जर्नी फक्त Unplanned होती.. मी पूर्णपणे Planned आणि Safe होतो. कमाल वाटतंय..फ्रेश वाटतंय.. आता 2025 मध्ये नव्याने लढण्याचे बळ मिळाले एवढं नक्की. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे एकटा सगळं करू शकलो.. love you all..
संकेतने 'अजूनही बरसात आहे' मालिकेत काम केलं होतं. तसंच H.M. बने T.M. बने मालिकेतही तो दिसला. 'टकाटक' या सिनेमातही तो झळकला होता.