माझी तुझी रेशीमगाठ: 'या' कारणामुळे श्रेयसने घेतला मालिकेत काम करण्याचा निर्णय
By शर्वरी जोशी | Published: September 26, 2021 01:22 PM2021-09-26T13:22:05+5:302021-09-26T13:25:00+5:30
Shreyas talpade : या मालिकेच्या निमित्ताने श्रेयसने तब्बल १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यातील काम करण्याचा उत्साह पाहून प्रेक्षक त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत.
नाटक, मालिका आणि चित्रपट असा प्रवास करत बॉलिवूडपर्यंत उंची गाठणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. 'इक्बाल'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसने मराठीसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा मराठी कलाविश्वाकडे वळला आहे. अलिकडेच सुरु झालेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकत आहे. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर श्रेयस छोट्या पडद्यावर झळकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्या या पडद्यावर पाहतांना चाहत्यांना विलक्षण आनंद होत असल्याचं दिसून येतं. परंतु, त्यासोबतच श्रेयसला मालिकाविश्वात येण्यासाठी १७ वर्षांचा कालावधी का लागला? किंवा त्याने आता अचानकपणे मालिकेत येण्याचा निर्णय का घेतला?, असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळेच चाहत्यांच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याने 'लोकमत ऑनलाइन'च्या मुलाखतीत दिली आहेत.
छोट्या पडद्यावर सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका तुफान लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच ही मालिका कमी कालावधीत टीआरपीच्या शर्यतीत प्रथम स्थानावर जाऊन पोहोचल्याचं म्हटलं जातं. या मालिकेत श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळेच या तिघांची जोडीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून होत असलेला कौतुकाचा वर्षाव पाहून श्रेयसने सगळ्यांचे आभार मानात या मालिकेत येण्याचा निर्णय का घेतला ते सांगितलं.
"या दोन वर्षांमध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच कलाविश्वातही प्रचंड बदल झाला आहे. थेएटर्स बंद आहेत. त्यामुळे या पुढे आणखी काय होणार, आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहोत. याचा काहीच अंदाज लावता येत नाही. सध्या सगळं काही अस्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु, हे लवकरच सगळं सुरळीत होईल ही एकच आशा मनात कायम आहे. त्यामुळे जे होईल ते चांगलंच होणार आहे हा विश्वास मनात आहे", असं श्रेयस म्हणाला.
मिमस्टर व्हायचंय? सुमित पाटील सांगतोय या क्षेत्रात कशी आहे स्पर्धा!
पुढे तो म्हणतो, "या दोन वर्षांत खूप बदल झाले असले तरीदेखील ज्यावेळी मी प्रेक्षकांना भेटतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून ते मला मिस करतायेत हे सतत जाणवतं. अनेकदा ते माझ्या जुन्या मालिका युट्यूबवर किंवा ओटीटीवर शोधून शोधून पाहतात. इतकंच नाही तर काही जण रिपीट टेलिकास्ट सुद्धा पाहतात असं आवर्जुन सांगतात. त्यामुळे या प्रेक्षकांसाठी मला काही तरी करायचं होतं. त्याच दरम्यान ही मालिका मला ऑफर झाली. आणि, या इतक्या वर्षांचा, खासकरुन या दोन वर्षांमध्ये जो आमच्यातील संपर्क कमी झाला होता. तो पुन्हा कनेक्ट करण्यासाठी मी ही मालिका स्वीकारली."
श्रेयस तळपदेची रिअल लाईफ परी कोण माहितीये का? पाहा त्याच्या लेकीचे फोटो
दरम्यान, या मालिकेच्या निमित्ताने श्रेयसने तब्बल १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यातील काम करण्याचा उत्साह पाहून प्रेक्षक त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत. श्रेयसने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, एकांकिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘इक्बाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ आणि ‘हाउसफुल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. तसंच त्याने काही मराठी- हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.