"मला फोटो हवा म्हणून तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि...", अशोक मामांसोबत काम करताना टीव्ही अभिनेत्याला आला विलक्षण अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:13 IST2025-03-19T18:12:57+5:302025-03-19T18:13:16+5:30
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत मनोजची भूमिका साकारणारा अभिनेत्याला अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

"मला फोटो हवा म्हणून तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि...", अशोक मामांसोबत काम करताना टीव्ही अभिनेत्याला आला विलक्षण अनुभव
मराठीतील सुपरस्टार असलेल्या अशोक सराफ यांच्यासोबत एकदा तरी काम करायला मिळावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. कलर्स मराठीच्या मालिकेत काम करणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. अभिनेता स्वप्निल काळेला मालिकेच्या निमित्ताने अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.
कलर्स मराठीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'अशोक मा.मा.' या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत मनोजची भूमिका साकारणारा अभिनेत्याला अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने अशोक सराफ यांच्यासोबत फोटो काढले. हे फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
"Moment of the life♥️ मामांनी खांद्यावर हात ठेवला. आता 'आपण कोणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगा..डा! आपण कोणालाच नाही घाबरत. पण मामा, मला photo हवा म्हणून तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा माझं शुंतुनू, परशुराम असं सगळंच झालं. तुमच्या भाषेत व्याख्या विक्खी वोक्खो झालं. (मला माहितीये तुम्ही सगळ्यांनी हे त्याच चालीत आणि लयीत वाचलं) इतकी वर्षं तुम्हाला पाहून आणि आता तुमच्यासोबत काम करून खूप काही शिकलो आणि ह्यापुढेही शिकत राहू. 2 दिवस आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही गोपुकाकासारखं सांभाळून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद. हा योग जुळवून आणल्याबद्दल @colorsmarathi @kanhasmagic_official @bodhitreemultimedia चे खूप खूप आभार🙏", असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान,'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'अशोक मा.मा.' या मालिकांचा महासंगम लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत अशोक मामा वल्लरीसाठी धावून येत पिंगा गर्ल्सची मदत करणार आहेत.