मराठी कलाकारांचा अमेरिका दोैरा अन् झाली अशी गत, विशाखा सुभेदार म्हणाली, "इस्त्री, लाईट्स..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:19 PM2023-04-11T13:19:55+5:302023-04-11T13:23:39+5:30
मराठी कलाकार जेव्हा परदेशात शूटिंगला जातात तेव्हा काय होतं विशाखाची पोस्ट बघा.
मराठी कलाकार जेव्हा परदेशात शूटिंगला जातात तेव्हा तिकडे काय काय कष्ट घ्यावे लागतात याचा अनुभव अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) आणि तिच्या सहकलाकारांना आलाय. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी, आणि विशाखा सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाचे प्रयोग तिथे सुरु आहेत. अमेरिकेत गेले असताना पडद्यामागे मात्र काय काय मेहनत घ्यावी लागतीये याचं वर्णन विशाखाने एका पोस्टच्या माध्यमातून केलंय.
विशाखाने 6 फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत विशाखा आणि नम्रता कपड्यांना इस्त्री करत आहेत. तर आणखी एका फोटोत सर्वच कलाकार थकलेले दिसत आहेत. मात्र कितीही थकवा असला तरी त्यांना पुढच्या शोसाठी सज्ज व्हायचं आहे. विशाखाने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले,'Show साठी गेलोय... अनेक काम स्वतः च करावी लागतात... इस्त्री, सेट, प्रॉपर्टी, lights, music, सगळे सगळे स्वतःच.. आम्ही सगळेच ह्या जबाबदाऱ्या पेलावतोय.. Thank team.. कुर्रर्रर्रर्र प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार..!थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होतंय.. पण परदेशातील आपल्या माणसंची कौतुकाची थाप खुप समाधान मिळवून देते... आणि शेवटच्या फोटोमध्ये दार show ला थकलेले आम्ही पुन्हा एकदा सज्ज होतो पुढल्या प्रवासाला...'
मराठी कलाकारांना कामाच्या निमित्ताने कितीही फिरायला मिळत असलं तरी असेही हाल होतात हेच विशाखाने लिहिलंय. 'कुर्रर्रर्र' नाटकाची ही टीम जवळपास महिनाभर अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना हे कष्ट करावे लागणार आहेत.