'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 01:21 PM2024-12-02T13:21:28+5:302024-12-02T13:23:22+5:30
कौमुदी वलोकरची मित्र मंडळींसोबत धमाल; साजरी केली 'ब्राईड टू बी' पार्टी.
Kaumudi Walokar: तुळशीविवाह झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्न सराईला सुरूवात होते. त्यामुळे आता मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार लग्न करत आहेत. अलिकडेच 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही लग्नगाठ बांधली. आता लवकरच छोट्या पडद्यावरील एक नावाजलेली अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. नुकतीच तिने 'ब्राईड टू बी' पार्टी साजरी केल्याचं पाहायला मिळतंय.
गेल्या वर्षीच या अभिनेत्रीने डिसेंबर महिन्यात साखरपुडा केला होता. आता लवकरच लग्नबंधनात अडकून ही अभिनेत्री आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील कौमुदी वलोकर(Kaumudi Walokar) आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शूटिंग १९ नोव्हेंबरला संपलं. दरम्यान, 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीचा मुलगा म्हणजेच यशची बायको आरोहीची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. परंतु आता कौमुदी वेगळ्याच कारणामुळेच चर्चेत आली आहे. अगदी गेल्या महिन्यातच कौमुदीचं केळवण पार पडलं. त्यात आता अभिनेत्रीने तिच्या मित्रमंडळींसोबत ब्राईड टू बी पार्टी साजरी केली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावरून कौमुदी वालोकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे.
कौमुदी वलोकरने 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करून छोटा पडदा गाजवला. त्याआधी अभिनेत्रीन 'शाळा' चित्रपटात झळकली होती. परंतु तिला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.