"मला बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते", अदिती सारंगधरने सांगितला प्रेग्नंन्सी काळातील अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:06 AM2024-06-07T10:06:26+5:302024-06-07T10:06:51+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदितीने गरोदर असताना बिअर पिण्याचे डोहाळे लागल्याचा खुलासा केला.
अदिती सारंगधर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली. अदिती अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. या मुलाखतीत अदितीने गरोदर असताना बिअर पिण्याचे डोहाळे लागल्याचाही खुलासा केला.
अदितीने नुकतीच 'आरपार ऑनलाईन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रेग्नंन्सी आणि त्यानंतरच्या काळाबद्दल भाष्य केलं. अदिती म्हणाली, "गरोदर असल्याचं समजल्यानंतर मी खूप उत्सुक होते. मला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी प्रेग्नंन्सीमध्ये बिअर प्यायचे. मी इंडियन फूड खाल्लचं नाही. मी फक्त सलाड खायचे आणि बिअर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं होतं. मी काय करू? मला कसं तरी होतं. बिअर नाही प्यायले तर राग येतो. मग त्या मला म्हणाल्या की २-२ सीप प्या. मग मी ९ महिने बिअर प्यायले. भात आणि फोडणी वगैरे आली की त्यातील एक एक मोहरी काढून बाजूला करायचे. घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे इंडियन फूडच बंद केलं. फक्त सलाड आणि बिअर..."
अदितीने या मुलाखतीत प्रेग्नंन्सीनंतर येणाऱ्या डिप्रेशनबद्दलही भाष्य केलं. "बऱ्याच लोकांना माहीत नसतं की प्रेग्नंन्सीनंतर पोस्टमार्टम डिप्रेशनदेखील येतं. म्हणजे बाई कधीही रडते. तिला मूड स्विंग्स असतात. मला आवर्जुन सांगावंसं वाटतं की बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या. ती बाई आनंदी राहिली पाहिजे. ती आनंदी राहिली तर मुलाची योग्य काळजी घेऊ शकले. येणारी माणसं बाळाला बघायला येतात. पण, आईनेही तेवढंच सोसलेलं असतं. पण, लोकांना याची जाणीव होत नाही. मी माझ्या बाळाला कोणाच्याही हातात द्यायचे नाही. कारण, त्याला काही इन्फेक्शन झालं तर रात्री जागायला किंवा त्याची काळजी घ्यायला तुम्ही येणार नाहीये. माझ्या मदतीला कोणीच नव्हतं," असंही अदितीने सांगितलं.
दरम्यान, अदितीने 'वादळवाट', 'हम बने तुम बने', 'माझे मन तुझे झाले', 'लक्ष्य' या मालिकांमध्ये काम केलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'ती रात्र', 'मजनू', 'नवरा माझा भवरा', 'उलाढाल', 'नाथा पुरे आता' या सिनेमांमध्येही ती झळकली होती.