EXCLUSIVE: "अद्वैत दादरकर म्हणजे माझा गुरु", आरती मोरेने कॉलेजच्या आठवणींना दिला उजाळा
By ऋचा वझे | Published: April 8, 2024 04:44 PM2024-04-08T16:44:58+5:302024-04-08T16:45:54+5:30
आरतीला तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून कोणाकोणाची साथ लाभली?
'पिंकीचा विजय असो' मालिकेतील मुख्य अभिनेत्री आरती मोरे (Arti More) सध्या प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. सडेतोड, फटकळ बोलणारं असं तिचं पात्र असलं तरी खऱ्या आयुष्यात आरती अगदी मितभाषी, बुजरी आहे. त्यामुळे आपल्या स्वभावाविरोधातील भूमिका ती पडद्यावर साकारत आहे. आरतीची मराठी मनोरंजनविश्वातील सुरुवात नक्की कशी झाली, या प्रवासात तिला लाभलेला गुरु कोण याबद्दल नुकतीच तिने 'लोकमत फिल्मी'ला माहिती दिली.
मुंबई सेंट्रलच्या BIT चाळीत वाढलेल्या आरतीने लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं. यासाठी तिला तिच्या आईनेच प्रोत्साहन दिलं. रुपारेल कॉलेजमधील नाट्यविभाग तिच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉईंट होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "रुपारेल कॉलेजमध्ये मला लाभलेला गुरु अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar). त्याने मला प्रसिक्षण दिलं. माझ्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत हे त्याने माझ्यासमोर आणून ठेवलं. तेव्हा कॉलेजच्या नाट्यविभागात नवीन लोकांची फळी झाली होती. अद्वैतने मे महिन्याच्या सुट्टीत वर्कशॉप घेतलं. आम्हा नवीन लोकांना घेऊन त्याने 'टक्कल पडलेली सुंदरी' हे नाटक बसवलं. आमच्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका आम्हाला दिल्या होत्या. त्यामुळे वर्कशॉप, नाटक यातलं अगदी छोटं छोटं कामही अद्वैतने तेव्हा आमच्याकडून करुन घेतलं. "
ती पुढे म्हणाली, "नंतर मला एकांकिका स्पर्धांमधून मला एका फिल्मची ऑफर झाली. 'वेगेवेगे धावू' या एकांकिकेतही मी काम केलं जो कमाल अनुभव होता. त्यामुळे माझ्या आजूबाजूला असे लोक असल्याने माझा ग्राफ उंचावतच गेला. मला कुठेच पैसे भरुन शिकायची गरज भासली नाही. या लोकांनीच मला ज्ञानाने खूप श्रीमंत केलं. तसंच अक्षय पाटीललाही मी श्रेय देते. त्याने आजपर्यंत मला करिअरमध्ये दिशा दाखवली आहे. तसंच गौरी नलावडे जी माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे. या सगळ्यांनीच मला मोलाची साथ लाभते."
आरतीचं नाटक हेच पहिलं प्रेम राहिलं आहे. थिएटरने तिला खूप काही शिकवलं. सध्या ती मालिकेत मुख्य भूमिका साकारत असली तरी सोबतच तिचं एखादं नाटक सुरु असतं. प्रिया बापटच्या 'दादा एक गुडन्यूज आहे' नाटकात आरती, उमेश कामत, आशुतोष गोखले यांच्यासोबत दिसत आहे.