भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?

By देवेंद्र जाधव | Published: October 7, 2024 01:51 PM2024-10-07T13:51:42+5:302024-10-07T13:59:40+5:30

'आई कुठे काय करते', 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अश्विनी महांगडेसोबत दिलखुलास गप्पा (ashvini mahangde)

marathi actress ashvini mahangade from talk about relation with sharad pawar supriya sule and maharashtra forts | भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?

भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?

लोकमत फिल्मीच्या 'नवदुर्गा' या उपक्रमात आजची नवदुर्गा आहे लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे. अभिनयक्षेत्रात लोकप्रिय असलेली अश्विनी महांगडे राजकारण आणि समाजकारणात सुद्धा उत्साहाने सहभाग घेते. अश्विनीने तिची अभिनय कारकीर्द, गड किल्ल्यांची दुरवस्था, तिचा संघर्षाचा काळ या मुलाखतीतून दिलखुलासपणे उलगडलाय.

>>> देवेंद्र जाधव

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही अभिनय क्षेत्रात यायचा निर्णय कसा झाला?

माझे वडील अभिनेते-दिग्दर्शक. वडिलांनी जवळपास १७ राज्यनाट्य स्पर्धा केल्या आहेत. वाई युवा केंद्राच्या अंतर्गत त्यांनी या स्पर्धा केल्या. त्यामुळे मी जे काही शिकले ते त्यांच्याकडून. पसरणी माझं गाव. पद्मश्री शाहीर साबळे आणि पद्मश्री बी.जी.शिर्के अशा दोन पद्मिश्री प्राप्त महान व्यक्तिमत्वांचं हे गाव. आमच्याकडे यात्रेला खूप आधीपासून गावातील मंडळी नाटक करायचे. गावातील व्यक्ती नाटक दिग्दर्शित करुन त्यावर काम करायचे. माझी सुरुवात यात्रेतल्या नाटकातून झाली. या नाटकात आमचे छोटे डान्स असायचे. पुढे मी कॉलेजला गेल्यावर 'यदा कदाचित' नाटक बसवलं. माझ्या वडिलांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. सुरुवात इथूनच झाली. शाळा-कॉलेजमध्ये असताना कुठे डान्स स्पर्धा असली की वडील माझा डान्स बसवायचे.

कॉलेज संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मला मुंबईत यायचं होतं. मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. त्याच वेळी मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होते. वाईमध्ये बऱ्याच मालिका, सिनेमांचं शूटींग व्हायचं. त्यावेळी मी छोट्या भूमिका करायचे. माझा डान्स ग्रुप होता. 'नृत्यांकुर कलामंच' या डान्स ग्रुपमध्ये मी होते. वाईला कोणत्या सिनेमाचं शूटींग असल्यावर डान्सरची गरज असायची तेव्हा आम्ही सगळे डान्स करायचो. अनेक मराठी, हिंदी, भोजपुरी फिल्मसमध्ये मी डान्स केलाय. 'आबा जिंदाबाद' या सिनेमात जवळपास सगळ्या गाण्यात आम्ही आहोत. 'निरहुआ रिक्षावाला' या भोजपुरी सिनेमात काम केलंय. रवी किशन यांच्याही फिल्म्स वाईमध्ये शूटला यायच्या तर आम्ही कोरसला डान्स करायचो. अशी ती एक गंमत होती.

मुंबईला आल्यावरही मी राज्यनाट्य स्पर्धा करायचे. तेव्हा वाईमधली माणसं मुंबईत ऑडिशनला जा असं सांगायचे. प्रायोगिक नाटकं करत होते. मुंबईत आल्यावर 'आधी बसू मग बोलू' या लता नार्वेकर निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात काम करायची संधी मिळाली. या नाटकात छोटाशी भूमिका मिळाली. पुढे मग contact मिळवले. अनेक ठिकाणी ऑडिशन दिली. तेव्हा एपिसोडीक मालिका खूप चालायच्या जसं की 'लक्ष्य', 'क्राईम डायरी'. या मालिकांमुळे फायदा असा झाला की, अशा पद्धतीच्या मालिकांमुळे त्यांना सतत कलाकार हवे असतात. नवीन लोकांना कॅमेराचं शिक्षण मिळण्यासाठी या मालिका फार गरजेच्या आहेत. या मालिकांमुळे मी थोडीशी धीट झाले. थोडीशी मला माहिती कळाली. त्यानंतर मला पहिली मालिका मिळाली ती होती अस्मिता. तीन वर्ष मी ही मालिका केली. त्यानंतर 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका केली आणि त्या मालिकेने माझं आयुष्यच बदलवून टाकलं. आता 'आई कुठे काय करते', 'मन मंदिरा'सारखी किर्तन मालिका सुरु आहे.


भोजपुरी सिनेमाचा काय अनुभव आहे?

भोजपुरी सिनेमाच्या शूटींगचा अनुभव एकदम गंमतीदार आहे. ज्या मुली कोरसला डान्स करतात त्यांना कुठेतरी पळत 'ला ला ला' वगैरे करायचं असतं. एक मास्टर शॉट असतो. सुरुवातीला हिरो - हिरोईन डोंगरावर असतात. नंतर कॅमेरा पॅन होतो. नंतर त्या मुलींना पळावं लागतं. पळता पळता त्या मुली पडायच्या. कारण पावसाचे दिवस असायचे. हा स्ट्रगल फार होता. प्रसाद सुर्वे वाईचे चित्रा टॉकीजचे मालक आहेत. आपल्या चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. त्यांचा एक सिनेमा होता 'ओटी कृष्णामाईची'. या सिनेमात अलका कुबल, प्रदीर कोथमिरे यांनी काम केलंय. या सिनेमात मी डान्सर म्हणून काम केलंय. पुढे प्रदीप कोथमिरे यांच्यासोबत 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत काम केलं. पुढे 'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये काम करताना मी प्रदीप यांना सांगितलं की त्यांच्यामागे मी डान्स केलाय. तेव्हा त्यांनाही छान वाटलं आणि ते भारावून गेले.

वाईसारख्या भागातून मुंबईत स्वतःची ओळख मिळवणं किती अवघड होतं?

फारच अवघड होतं. माझे वडील नाटकात जरी काम करत असले तरीही इथे येऊन contact मिळवणं आणि एखाद नाटक मिळवणं खूप अवघड होतं. अशातच संजय नार्वेकर, सुशांत शेलार, योगिनी चौक सारख्या कलाकारांसोबत काम करायला मिळणं हीच फार मोठी गोष्ट आहे. अक्षय शिंपी त्या नाटकात काम करायचा. अक्षय त्या नाटकात चंद्रकांत कुलकर्णींना असिस्ट करत होता. त्यावेळी नाटकाचं पहिलं वाचन त्याच्यासोबत केलं. तेव्हा त्याला जसं हवंय तसं त्याने माझ्याकडून करवून घेतलं. अक्षयमुळे खरंतर मला 'आधी बसू मग बोलू' हे नाटक मिळालं. नाटकाच्या वाचनाला सगळे मोठे कलाकार होते. पण अक्षयने माझ्याकडून मेहनत करवून घेतली.

प्रवास हा अवघडच असतो. इथपर्यंत येऊन नाव कमावणं,  मेहनत करणं हे सोप्पं नाहीये. तीन वर्ष मालिका करुनही अभिनयक्षेत्रात नाव कमावू शकले नाही पण 'स्वराज्यरक्षक संभाजी' या एका मालिकेमुळे लोक मला नावानिशी लोक लागली. मी कुठेही महाराष्ट्रात गेले तरी लोक मला आदराने ताई, अक्का म्हणतात. मला या मालिकेने सबंध 'महाराष्ट्राची बहीण' बनवलीय. ही फार मोठी जबाबदारी वाटते मला.


कधी कास्टिंग काऊचचा विचित्र अनुभव आलाय?

माझं भाग्य की, मला कधी असा अनुभव आला नाहीय. मुळात मी फार कामं नाही केलीत. आणि जी कामं केलीत त्यावेळी सोबत असलेली लोक चांगल्या बॅकग्राऊंडची होती. अशा माणसांसोबत काम केल्याने मला तसा अनुभव आला नाही. आणि पुढेही येणार नाही. कारण तेवढा दबदबा मी बनवलाय की, समोरचा माणूस मला असं काही विचारताना हजारवेळा विचार करेन. नशीब समजायचं की आपल्याला तसा काही अनुभव आला नाही.

तू अनेकदा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत राजकीय मंचावर दिसलीस. तर इथे प्रवेश कसा झाला?

या निवडणुकांमध्ये मी पवार साहेबांच्या मंचावर असल्याने मला खूप लोकांनी ट्रोल केलं. मी वेळोवेळी सडेतोड उत्तरं दिली. पण त्यामागची पार्श्वभूमी समजणं महत्वाचं आहे. पसरणी गावात माझ्या वडिलांनी राजकारणात पिढ्या घडवल्या. त्यामुळे वडिलांच्या रक्तातून ते माझ्या रक्तात आलंय. समाजकारण आणि राजकारण यांची गाठ आपण योग्य पद्धतीने बांधली ना, तर रक्तप्रवाह जसा व्यवस्थित होतो तसंच आपण नीट लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, असं वडिलांचं मत होतं. मी कॉलेमध्ये असतानाच GS च्या निवडणुका ते खासदारकी असा सगळा प्रवास आणि प्रचार केलाय.

माझ्या वडिलांनी शरद पवारांना नेतृत्व म्हणून खूप आधीच स्वीकारलंय. घरात आमच्याकडे संस्कार तेच होते. आमच्या घरात जेवताना पण चर्चा व्हायची की, पवार साहेबांनी हे केलं आणि त्याचे आता पडसाद उमटले आहेत. आमदार सुद्धा माझ्या वडिलांना फोन करुन कोणती कामं राहिली असतील तर चौकशी करायचे. वडील सुद्धा ज्या गोष्टीची गरज आहे ते सांगायचे. त्यामुळे माझ्यावरही तसेच संस्कार झालेत. जर शरद पवार साहेब नाहीत तर मी कोणतं नेतृत्व स्वीकारु शकते, असाही विचार माझा करुन झालाय. खरं सांगायचं तर, राजकारण इतकं किचकट झालंय त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल मला सध्या कोणत्याच भावना मनात दाटून येत नाहीत.

माझा लहान भाऊ हा पसरणी गावचा उपसरपंच आहे. आपली मतं आपण ठामपणे मांडली पाहिजेत. वडील हयात नसले तरीही अजूनही मी त्यांच्याशी खूप कनेक्टेड आहे. सुप्रियाताई, शरद पवारसाहेब यांचंही नातं तसंच आहे. मी आता पुस्तक वाचतेय पवार साहेबांचं, त्या माणसाने किती काम करुन ठेवलंय. ज्या मुलांकडे रिचार्ज मारायला नाहीत जे दुसऱ्यांच्या वायफायवर जगतात, ते सुद्धा पवार साहेबांवर कमेंट करतात. तुम्हाला राजकारण जर शिकायचं असेल तर त्या माणसाचा शांतपणे अभ्यास करा. आपण या राजकारणाचा खूप मोठा भाग आहोत कारण आपण मतदार आहोत. म्हणूनच मला वाटतं 'रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान' स्थापन करण्याची प्रेरण यातूनच आली. कारण माझ्या वडिलांनी माझा पाया भक्कम केलाय.


भविष्यात कधी राजकीय क्षेत्रात यायचा विचार आहे का?

१८ वर्षांची झाल्यापासूनच आपण राजकीय क्षेत्राचा पायाच आहोत. पण भविष्यात मला असं काही काम करण्याची आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्याची काही संधी मिळाली तर मी भविष्यात नक्की त्याचा विचार करेन.

रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान या तुझ्या संस्थेची सुरुवात कशी झाली? तुम्ही केलेली उल्लेखनीय कामं?

निलेश जगदाळे हे या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सुरु झाल्यावर त्यांच्या डोक्यात विचार आला की, आपण सामाजिक संस्था स्थापन केली तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी करुन वेगवेगळ्या स्तरावर कामं करु शकतो. या गोष्टीला मी दुजोरा दिला आणि ही संस्था स्थापन झाली. आता नवरात्र आहे म्हणून सांगायचं तर, आम्ही नवदुर्गा हा पुरस्कार देतो. लोकांना सांगून आम्ही त्यांच्या आसपास समाजासाठी काम करणाऱ्या ९ महिलांची निवड करुन त्यांना नवदुर्गा हा पुरस्कार देतो.

कोरोनामध्ये आम्ही लोकांसाठी बरंच काम केलेलं आहे. गावखेड्यात मासिक पाळीविषयी मुलींच्या मनात फार संकोच आहे. त्यामुळे मी वेबसीरिज शूट केली. ही वेबसीरिज आम्ही शाळा, कॉलेजमध्ये दाखवून त्यांचं प्रबोधन केलं. गड, किल्ले संवर्धनाचं काम करतो. वर्षातून सात किल्ले घेऊन आम्ही त्यांची साफसफाई करतो. दिवाळी आल्यावर गड-किल्ले स्पर्धा भरवून मोठ्या रकमेचे पुरस्कार देतो. ऑनलाईन फोटो घेऊन आम्ही त्या मुलांच्या मुलाखती घेतो. त्याने जो किल्ला तयार केलाय त्याची बेसिक माहिती त्याला आहे का? हे विचारून नंबर ठरवून आम्ही त्यांना पुरस्कार देतो. रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करतो. कोणाला खरंच एखादी आर्थिक गरज असेल तर खिशातून पैसे काढून आम्ही काम करतो.

आम्हाला कोणतेही सरकारी पैसे मिळत नाहीत. प्रतिष्ठानसाठी काम करणारी माणसं स्वतःच्या खिशातून पैसे काढून मदत करत असतात. 'रयतेचं स्वराज्य परिपूर्ण किचन' हा आमचा पहिला उपक्रम होता. ज्यात मीरारोडला आपण ४० रुपयात हॉटेलमध्ये पोटभर जेवण देत होतो. अशापद्धतीची कामं आम्ही करतच आहोत. सेलिब्रिटी असून लोकांमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. तुम्ही जसे आहात तसे लोकांमध्ये एक सकारात्मकता पसरवली तर खूप चांगलं असतं. (रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेचा हेल्पलाईन नंबर: 9763851003)


गड किल्ल्यांची सध्याची अवस्था काय आहे? आणि ही अवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल?

माझं परखड मत आहे की, आपल्याकडे अतोनात निधी दिला जातो पण तो गड किल्ल्यांसाठी वापरला जातो का? हा माझा प्रश्न आहे. तो नाही वापरला जात. इतकं दुर्लक्ष! वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधील मुलं ही खरं मावळे आहेत. ही मुलं कोणाकडून एक रुपया न घेता गडकिल्ल्यांवर जाऊन साफसफाई करतात. खूपदा पाणी साचलं असतं. त्यात माती असते. त्यावेळी सामाजिक संस्थांमधली ही मुलं काम करतात. सरकारकडे इतका पैसा असून ते का नीट काम करत नाही हा प्रश्न कायम माझ्या मनात असतो. सरकारने सांगूच नये की, आम्ही तिकडे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं. जी दुर्घटना झाली त्याबद्दलही आपण इतरांच्या मुलाखती ऐकतच होतो.

मीरारोडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचं स्मारक आहे. त्या स्मारकाची गुणवत्ता खूप छान आहे. महाराजांकडे पाहताना आपल्याला आपली लायकी कळते. मी रोज शूटला जाताना तिकडे थोडावेळ थांबून नमस्कार करते. तिथले आमदार प्रताप सरनाईक साहेब त्यांच्या अंतर्गत ते स्मारक झालंय. इथे पक्षाचा मुद्दा नाही येत. पण या माणसाने कमाल काम केलंय. आम्ही टॅक्स भरतोच आहोत, तुम्ही उत्तम काम करा ना, आम्हाला आवडेलच. खऱ्या अर्थाने सरकारकडे इतका प्रचंड पैसा आहे ना, तर त्यांनी ठरवलं ना आम्हाला चोख काम करायचंय, तर मला नाही वाटत मुलांना व्हिडीओ टाकायची पडेल की या किल्लावर ढासळलंय वगैरे. जे आहे तेच टिकवलं ना आपण तरी आपल्यासाठी खूप आहे. दगड मातीचे किल्ले असून त्यात एक जान आहे.


सामाजिक कार्यामध्ये सक्रीय असलेल्या महिलेला इतरांकडून नाराजी सहन करावी लागते. तुला असा कधी अनुभव?

मला असा अनुभव आला नाही. माझ्या पाठीशी चांगली माणसं आहेत. जे मला फॉलो करतात त्यांना माझं कौतुकच वाटतं की, अश्विनी असं काहीतरी काम करतेय. अश्विनी कलाकार असल्याने तिच्या मागे गडबड आहे. तरीही ती या कामात वेळ देतेय. त्यामुळे मला असा कधी निगेटिव्ह अनुभव नाही आलाय.

राणुअक्का, अनघा या तुझ्या भूमिका खूप लोकप्रिय झाल्या. त्याविषयीचा काय अनुभव

राणुअक्काच्या भूमिकेने माझं आयुष्यच बदलून टाकलं. अनघाबद्दल सांगायचं तर ती एक गुणी आत्मा आहे. तिला कितीही रागावून बोललं तरी ती शांतपणे तिचं मत मांडते. त्याजागी अश्विनी असती तर समोरच्या माणसाची चिरफाड केली असती. अनघासारखं होणं अश्विनीलाही शक्य नाही. नुकताच आम्ही 'धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर' हा सिनेमा पूर्ण केला. १४ महिन्यांची प्रोसेस होती. हा सिनेमा लोकांनी बघितल्यावर त्यांना वाटेल की, अश्विनीच्या आयुष्यातलं खूप चांगलं काम आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.


अभिनयक्षेत्र, समाजकारण, राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना काय सांगशील?

प्रत्येक मुलीला किंवा महिलेला तिला कोणत्या क्षेत्रात आनंद मिळतोय हे जाणून घेऊन तशी मेहनत करायला हवी. तुम्हाला लगेच वरची पायरी मिळणार नाही. तुमचा प्रवास खालून सुरु झाला तरच तुम्ही परिपक्व होता. जेव्हा तुम्ही १०० टक्के देऊन काम करता तेव्हाच तुमच्या यशाच्या पायऱ्या सुरु होतात. मी अभिनयक्षेत्रात थोडंसं सातत्य ठेवल्याने मी इथे थोड्याफार प्रमाणात पाय रोवू शकले. सातत्य ठेवणं हाच उपाय आहे. तुम्ही एखादं काम करायचंच आहे हे डोक्यात फिक्स ठेवलं की तुम्ही तीर मारता. आपण शाहरुख खान यांना बादशाह म्हणतो. त्यांची सुरुवातही मालिकेपासूनच झाली. पण आज ते नंबर १ वर आहेत. 'लक्ष्य', 'क्राईम डायरी' फक्त ३ दिवसांचं काम देत असलं तरी खूप अभ्यास मी करत होते. सातत्य ठेवा सगळं होतं आयुष्यात.


नवरात्रीनिमित्त करत असलेल्या अनोख्या फोटोशूटबद्दल काय सांगशील?

दरवर्षी मी गेल्या पाच वर्षांपासून नवरंगाचं फोटोशूट करते. यावर्षी थोडासा बदल करुन ९ रंग, ९ कथा, अभिनयाचे ९ रस आणि ९ व्यक्तिरेखा अशी संकल्पना केलेली आहे. अभिनेत्री आहे तर फक्त नऊ रंगाच्या साड्या नेसून मी फोटोशूट करत आले. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनी काही पुरातन काळातल्या संकल्पना सजेस्ट केल्यात. माझी मैत्रीण भाग्यशाली राऊतने लिहिलेल्या संकल्पनांवर आम्ही बोलीभाषेत कमी शब्दात कथा लिहिल्या आहेत. द्रौपदी संकल्पनेचं शूटींग करताना मी २ महिने मी व्यवस्थित डाएट केलंय.  Concept - दिग्दर्शक विवेक देशपांडे, Concept writer - भाग्यशाली राऊत, Photographer - कुलदीप शिंदे, Makeup artist - अपर्णा लोणे ही चार जणांची टीम यासाठी काम करतेय.

Web Title: marathi actress ashvini mahangade from talk about relation with sharad pawar supriya sule and maharashtra forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.