मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:04 PM2024-05-01T18:04:41+5:302024-05-01T18:06:06+5:30
अभिनेत्री म्हणाली, 'समाजाचे काही देणे लागतो या विचाराने...'
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकांचं वारं वाहत आहे. प्रत्येक पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. अगदी मनोरंजनसृष्टीतही निवडणूकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. काही सेलिब्रिटी पक्षाच्या प्रचारासाठी उतरले आहेत. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देत सभेला हजेरी लावली. यावेळी ती शरद पवारांसोबत ती स्टेजवरही दिसली. इतकंच नाही तर भाषण करत तिने लोकांचा उत्साह वाढवला.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ मैदानात उतरली आहे. कालच तिने शरद पवारांच्या तुतारी चिन्हाला पाठिंबा देत सभेला हजेरी लावली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते. सोनेरी रंगाच्या साडीत अश्विनी पोहोचली. स्टेजवरुन भाषण करत तिने उपस्थित लोकांना प्रोत्साहनही दिलं. तिने याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "माझे वडील कै. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी पाहिले स्वप्नं आणि त्यासाठी फार आधीपासून त्यांनी आम्हा भावंडांना तयार केले. समाजाचे काही देणे लागतो या विचाराने मला जेवढे माझ्या माणसांसाठी काम करता येईल तेवढे मी नक्की करेन."
अश्विनी महांगडे अनेक तिचे राजकीय मत मांडताना दिसते. तसंच तिची छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. तिला शिवकन्या असंही चाहते संबोधतात. 'ताई योग्य व्यासपीठावर आलात' अशी कमेंट एकाने या व्हिडिओवर केली आहे. काही दिवसांपूर्वीच अश्विनीने मुंबईत नवीन घर घेतलं. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत अनघा ही व्यक्तिरेखा साकारत आहे.