"मी आत्महत्या करायला गेले होते", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "त्यावेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:28 AM2023-10-28T11:28:52+5:302023-10-28T11:30:32+5:30
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा
अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्काची भूमिका साकारलेल्या अश्विनीने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली. नाटकांपासून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अश्विनीने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विनीने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या मुलाखतीत अश्विनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासाही केला.
"आपण करिअर सुरू करताना काही वेळानंतर काहीच घडत नसेल तर आपल्याला असं वाटतं किती वर्ष प्रयत्न करायचे. अजून किती संकटांना सामोरं जायचं. मला जगायचंच नाहीये, असा विचार आपल्या मनात येतो. मलाही असं वाटलं होतं. मी आत्महत्या करायला गेले होते. मीरारोडला शिवार गार्डन परिसरात एका तलावाजवळ जाऊन बसले होते. तेव्हा माझे होणारे पती आणि माझी बेस्ट फ्रेंड सतत फोन करत होते. पण, त्यांनी मला सांगितलं की फक्त एकदा नानांशी बोल. तेव्हा नाना मीरारोडला मावशीकडे आले होते. त्यामुळे ते तिथेच होते. तेव्हा मी खूप रडत होते. मी नानांना फोन केला आणि मला जगायचंच नाही असं सांगितलं. त्यांनी मला कुठे आहेस विचारलं. माझी मावशीची मुलगी त्यांना तिथे घेऊन आली," असं अश्विनीने अजब गजबला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "नाना आले आणि माझ्या शेजारी बसले. मी खूप रडत होते. त्यांनी मला शांत होऊ दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली, हे बघ परमात्म्याने तुला काहीतरी बेस्ट करायला इथे पाठवलं आहे. जे तुझ्याकडून अद्याप घडलेलं नाही. मग, तुझी सुटका कशी होणार? ते बेस्ट करण्यासाठी थांब आणि मी थांबले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं. आज मी जे काही केलं आहे ते नानांमुळे आहे."
"मला तरुण पिढीला हेच सांगायचं आहे की संकट सगळ्यांना येतात. पण, त्या कठीण काळात आपण कोणाशी बोलतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. आत्महत्या करणारा माणूस निघून जातो. पण, जे जगतात त्यांच्यासाठी प्रत्येक रात्र, त्याचा वाढदिवस, त्याचे क्षण जेव्हा जेव्हा आठवतात, तेव्हा ते खूप भयंकर अवस्थेतून जात असतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही गरजेचे नाही आहात. पण, तुम्ही घरातल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे असता," असंही तिने सांगितलं. अश्विनी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.