Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
By कोमल खांबे | Published: November 14, 2024 05:25 PM2024-11-14T17:25:00+5:302024-11-14T17:26:02+5:30
मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.
रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून लेडी सिंघम दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिच्या अभिनयाची छाप सोडली. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भाग्याने रोहित शेट्टीच्या बिग बजेट सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला. तसंच 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करतानाचा अनुभवही भाग्याने सांगितला. ती म्हणाली, "खरं तर मला असं वाटलेलं की दीपिकासोबत माझा सीन आहे, पण आम्ही वेगवेगळ्या फ्रेममध्ये उभे राहू. आम्ही दोघी एका फ्रेममध्ये समोरासमोर उभं राहून सीन होईल, असं मला वाटलं नव्हतं".
"मला अनेकांनी विचारलंदेखील की दीपिका स्वत: समोर उभी होती का? पण, तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं हा वेगळा अनुभव होता. आपण विचार करतो की ही किती मोठी अभिनेत्री आहे. पण, तसं काहीच नसतं. ते पण, आपल्यासारखेच असतात. पहिल्यांदा जेव्हा ती आली तेव्हा ती माझ्याकडे बघून हसली. आम्ही एकमेकींकडे बघून हसलो. त्यानंतर अगदी नॉर्मलपणे तिने सीन केला", असंही पुढे तिने सांगतिलं.
'सिंघम अगेन' सिनेमातून रोहित शेट्टीने अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं आहे. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या रोहित शेट्टीच्या सिनेमात अनेक मराठी कलाकारांचीही वर्णी लागली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.